शिवनेरीवर कचरा कमी होऊ लागला; प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी
जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान आणि दोन हजार वर्षांपूर्वीच्या बुद्धलेणी असलेल्या किल्ले शिवनेरीवर वन विभागाकडून प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. पर्यावरण व निसर्गप्रेमींकडून या निर्णयाचे मोठे स्वागत होत आहे. किल्ले शिवनेरीवर देशी-विदेशी पर्यटक व शिवभक्त मोठ्या संख्येने येतात. शिवनेरी गडावरील जैवविविधता व पर्यावरण अबाधित राहावे तसेच पावित्र्य राखले जावे, यासाठी जुन्नर वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या वतीने दि. 21 मार्चपासून शिवनेरीवर प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. केवळ निर्णय घेऊन प्लास्टिकबंदीची ही घोषणा हवेत विरून जाऊ न देता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करून या कारवाईला एक मूर्त स्वरूप देण्यात आले आहे.
शिवनेरी गडावरून पर्यटक पुन्हा खाली येताना पाण्याच्या रिकाम्या झालेल्या बाटल्या सोबत घेऊन येत आहेत. या बदलत्या चित्रामुळे गडावरील कचरा कमी होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. सध्या शाळांना उन्हाळ्याची सुटी असल्याने किल्ले शिवनेरीच्या भेटीला शैक्षणिक सहली व पर्यटक आपल्या कुटुंबांसह मोठ्या प्रमाणात येथे येत आहेत. दिवसभरात साधारणपणे 500 पर्यटक किल्ले शिवनेरीला भेट देत आहेत.
प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली जात असून, किल्ले शिवनेरीवर येणार्या पर्यटकांना पाण्याच्या बाटलीची नोंद व एका बाटलीमागे 50 रुपये अनामत रक्कम घेऊनच प्रवेश दिला जात आहे. गडावरून खाली आल्यानंतर रिकामी बाटली दाखवल्यानंतरच अनामत रक्कम पर्यटकाला परत दिली जात आहे. 21 मार्च ते 31 मार्च या कालावधीत 50 हजार 300 रुपये पाण्याच्या बाटल्यांची अनामत रक्कम म्हणून जमा झाली होती. सोबत नेलेल्या पाण्याच्या बाटल्या परत खाली आणल्यानंतर ही रक्कम पर्यटकांना परत देण्यात आली आहे. यापैकी केवळ दोनच बाटल्या खाली न आल्याची नोंद झाली आहे.
प्रतिबंधित साहित्य केले जातेय जप्त
अनामत रकमेमुळे पर्यटकदेखील काळजीपोटी रिकामी झालेली पाण्याची बाटली खाली येताना सोबत घेऊन येत आहेत. गडावर जाताना तंबाखू , गुटखा, माचीस, विडी, सिगारेट या वस्तू पर्यटकांसोबत आहेत का? याचीही खातरजमा केली जाते आणि या वस्तू जर आढळून आल्या तर त्या जप्त केल्या जात आहेत.
किल्ले शिवनेरीवर पर्यटकांनी फेकून दिलेल्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, गुटखा व तंबाखूच्या पुड्या आढळून येत नाहीत. प्लास्टिकबंदीच्या उपक्रमाला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवरायांचे जन्मस्थान असलेला किल्ले शिवनेरी हे आपल्याला बळ आणि ऊर्जा देणारे आहे. शिवजन्मभूमी दर्शनासाठी गडावर जाताना जबाबदारीची जाणीव मनात ठेवून गेल्यास कचरा करण्याचे विचार मनात येणारच नाहीत. शिवरायांच्या विचारांचे पाईक म्हणून जर विचार केला तर कारवाईचे निर्णय घेण्याची वेळच येणार नाही.
– प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, जुन्नर
शिवरायांच्या जन्मस्थळी नतमस्तक होण्याचे भाग्य लाभले. शिवनेरीचे बदलते स्वरूप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्लास्टिकबंदी तसेच गडावर स्वच्छतेबाबत काळजी घेतली जात आहे, हे मनस्वी आनंददायक आहे.
– कांचन काळे, पर्यटक, लंडन
हेही वाचा