पुणे : पुढारी वृत्तसेवा : जागतिक महिला दिनानिमित्त दैनिक 'पुढारी कस्तुरी क्लब' आयोजित आणि पी. के. बिर्याणी हाऊस प्रस्तुत 'द कलाकारा' या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात कला, संगीत, नृत्य, अभिनय यांचा सुंदर मिलाफ असलेले विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम कस्तुरी विभागप्रमुख आणि सदस्यांनी सादर करून चमक दाखवली. त्यांच्या कला सादरीकरणाला उपस्थितांनीही भरभरून दाद दिली.
पुढारी कस्तुरी क्लबमार्फत महिलांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे अनेक महिलांना व्यासपीठ मिळाले आहे. 'द कलाकारा' कार्यक्रमातून कस्तुरी क्लब विभागप्रमुख ल सदस्यांनी वैविध्यपूर्ण कलांचे सादरीकरण करत उपस्थित महिलांची मने जिंकली. महिलांनीही टाळ्यांचा कडकडाट करत त्यांच्या सादरीकरणाला दाद दिली. देवीचा गोंधळ असो वा लोककलांवर आधारित कार्यक्रम कस्तुरींनी सादर केले.
विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्या महिलांना सलाम करत विभागप्रमुखांचा फॅशन वॉकही लक्षवेधी ठरला. शालेय वयोगटापासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत अनेकींनी त्यात सहभाग घेतला. पी. के. बिर्याणी हाऊसचे कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य मिळाले.
स्पर्धेचे परीक्षण अभिनेत्री मेघना झुझम, डॉ. रितू लोखंडे यांनी केले. उपस्थित सर्व कस्तुरींना डॉ. अरुंधती पवार, उद्योजिका वंदना बजाज आणि श्यामल मोरे यांच्याकडून सुंदर व आकर्षक गिफ्ट देण्यात आले.
'द कलाकारा' स्पर्धेत कस्तुरी विभागप्रमुख व सदस्यांनी एकापेक्षा एक सरस गीत व नृत्य सादर केली. या स्पर्धेत कामिनी मेमाणे आणि ग्रुप यांनी 'विविधतेने नटलेला भारता'चे सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक मनीषा अडसूळ आणि त्यांच्या ग्रुपला देवीच्या गोंधळावर आधारित नृत्य सादरीकरणासाठी मिळाला. तृतीय क्रमांक संजीवनी उन्हाळे आणि ग्रुपने पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिक कस्तुरी क्लब विभागप्रमुखांच्या इतिहासाच्या पानावर आधुनिकता याविषयावरील सादरीकरणाला, तसेच लोकमान्य हास्य क्लब योग संघ सनसिटी यांना देण्यात आले.
दैनिक पुढारी कस्तुरी क्लबतर्फे आयोजित द कलाकारा कार्यक्रमातून महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले. कस्तुरी सदस्यांचे सादरीकरण अप्रतिम होते.
– डॉ. अरुंधती पवार
कस्तुरी क्लबसोबत मी अनेक वर्षे काम करत आहे. या माध्यमातून अनेक कस्तुरींना त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळत आहे.
– वंदना बजाज, उद्योजिका
कस्तुरी क्लबतर्फे आयोजित केले जाणारे कार्यक्रम खूप सुंदर आणि नियोजनपूर्ण असतात. कस्तुरी क्लबसोबत नेहमीच कार्यक्रमांच्या संयोजनात सहभागी होऊ.
– श्यामल मोरे
कस्तुरी क्लबसोबत कार्यक्रम आयोजनाचा पहिला अनुभव छान होता. नवी ऊर्जा आणि नवा उत्साह हा अनुभव देऊन गेला. पुन्हा अशाच कार्यक्रमाची प्रतीक्षा राहील.
– शुभांगी आणि संगीता पाटील, उद्योजिका, पी. के. बिर्याणी हाऊस
हेही वाचा