Pune : बीआरटी मार्गात कचर्‍याचे ढीग; बालाजीनगर परिसरातील चित्र | पुढारी

Pune : बीआरटी मार्गात कचर्‍याचे ढीग; बालाजीनगर परिसरातील चित्र

धनकवडी : पुढारी वृत्तसेवा : सातारा रस्त्यावरील स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्गावर बालाजीनगर परिसरात गेल्या आठवड्यापासून श्री सद्गुरू शंकर महाराज चौक ते श्री शाहू बँक चौकादरम्यान कचर्‍याचे ढीग साचल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे बीआरटी मार्गाचे विद्रूपीकरण होत असून हे कचर्‍याचे ढीग महापालिका प्रशासनाने तातडीने उचलावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून होत आहे.
बीआरटी मार्गामुळे नागरिकांचा पीएमपी बसचा प्रवास सुखकर झाला आहे. मात्र, बालाजीनगर परिसरात उड्डाणपुलाखाली श्री सद्गुरू शंकर महाराज चौक ते एलोरा पॅलेस चौकादरम्यान तीन ठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले आहेत.

गेल्या आठवड्यापासून हा कचरा उचलण्यात आला नाही. उड्डाणपुलाखाली दुभाजकामध्ये सुशोभीकरण करण्यात आलेल्या ठिकाणीदेखील ठिकठिकाणी कचरा साचल्याचे चित्र दिसून येत आहे. या कचर्‍यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच उड्डाणपुलाखाली वाहनांचे अनधिकृत पार्किंग करण्यात येत आहे, याकडे महापालिका, पीएमपी आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

इनोव्हेटिव्ह या संस्थेला कात्रज ते स्वारगेट रस्त्यावरील कचरा उचलणे व साफसफाई करण्याचे काम दिले आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून त्यांनी कचरा गोळा करून ठेवला आहे. कंपनीच्या अधिकार्‍यांशी पत्रव्यवहार करून लवकरात लवकर हा कचरा उचलण्यात येईल.

– विक्रम काथवटे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय.

हेही वाचा

Back to top button