रुग्णालय तयार; सुविधांची प्रतीक्षाच : लोहगाव रुग्णालयाची अवस्था | पुढारी

रुग्णालय तयार; सुविधांची प्रतीक्षाच : लोहगाव रुग्णालयाची अवस्था

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोहगाव आणि लगतच्या भागात आरोग्यसेवेला चालना देण्यासाठी 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असून, आरोग्य सुविधा प्रत्यक्षात कधी सुरू होणार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. आचारसंहिता संपल्यानंतर रुग्णालयाचे उद्घाटन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रुग्णालयाचा आढावा घेऊन उपजिल्हा रुग्णालयाची कामे 24 जानेवारीअखेर पूर्ण करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले होते.

मात्र, असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिक वेळ घेतला. त्यामुळे रुग्णालयाचे काम पूर्ण होण्यास विलंब झाला. लोहगाव उपजिल्हा रुग्णालयासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने 38.8 कोटी रुपये खर्च केले आहेत. लोहगावचे उपजिल्हा रुग्णालय सहा एकर परिसरात उभारण्यात आले असून, त्यात जनरल वॉर्ड, आयसीयू, प्रयोगशाळा आणि इतर सुविधांसह स्क्रीनिंग चाचण्या उपलब्ध असतील. रुग्णालयामध्ये ऑर्थोपेडिक्स, मेडिसिन, बालरोगतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ आदी तेरा विशेष विभाग असतील. रुग्णालयात लहान-मोठ्या ऑपरेशन थिएटरच्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हॉस्पिटलमध्ये डायलिसिस सेंटरदेखील सुरू केले जाईल.

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे. काही किरकोळ इलेक्ट्रिक काम सुरू आहे, ते येत्या काही दिवसांत पूर्ण होईल. रुग्णालयासाठी 13 डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिकल स्टाफसह 96 कर्मचारी नियुक्त केले जातील.

– डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, औंध जिल्हा रुग्णालय

हेही वाचा

Back to top button