चोरट्यांचा विमान प्रवास अन् मॉलमध्ये चोरी! राजस्थानी टोळी जेरबंद | पुढारी

चोरट्यांचा विमान प्रवास अन् मॉलमध्ये चोरी! राजस्थानी टोळी जेरबंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विमानाने प्रवास करून शहरातील मॉलमधून ब्रॅंन्डेड कपडे, बूट चोरी करणार्‍या राजस्थानी टोळीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. पुण्यात आल्यानंतर अ‍ॅपद्वारे कार भाड्याने घेऊन ही टोळी नामांकित मॉलमध्ये चोर्‍या करत होती. दोन गुन्ह्यांचा छडा लावत त्यांच्याकडून पोलिसांनी 4 लाख 17 हजार 995 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गौरव कुमार रामकेश मिना (वय 19), बलराम हरभजन मिना (वय 29), योगेश कुमार लखमी मिना (वय 25), सोनू कुमार बिहारीलाल मिना (वय 25, रा. सर्व राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. योगेश कुमार हा टोळीचा मोहरक्या आहे. त्याने देशातील विविध शहरांत अशाप्रकारे चोर्‍या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

संगमवाडी येथील एका नामांकित मॉलमध्ये आरोपींपैकी दोघांनी चोरी केली. मात्र, बाहेर पडताना त्यांचा हा प्रकार अलार्ममुळे उघडकीस आला. त्यातील एकाला सुरक्षारक्षकाने पकडून बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले, तर अन्य एक साथीदार फरार झाला. पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर बडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे यांनी खडकी बाजार येथील हॉटेल व पुणे स्टेशन परिसरातून इतर दोघांना पकडले. त्यांच्याकडून मॉलमधून चोरी केलेली महागडी कपडे, सूट, बेल्ट, टी-शर्ट असा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त संजय सुर्वे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिपान पवार, गुन्हे निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अभिजित जाधव, उपनिरीक्षक रवींद्र गावडे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

Back to top button