पुणेकरांनो जरा जपून ! तापमान 41 अंशांवर; हंगामातील सर्वोच्च तापमान | पुढारी

पुणेकरांनो जरा जपून ! तापमान 41 अंशांवर; हंगामातील सर्वोच्च तापमान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हुश्शऽऽ अखेर पाच दिवसांनी शहराचे किमान तापमान 27.9 अंशांवरून 18.5 ते 23 अंशांच्या खाली आले. त्यामुळे रात्रीचा उकाडा कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र, लवळे भागाचा पारा 41 अंशांवर गेल्याने हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. मंगळवारी (दि. 2 एप्रिल) शहराच्या कमाल तापमानात एक ते दीड अंशाने वाढ झाल्याने शहरात उष्णलहरींचा उद्रेक झाल्याचे पाहावयास मिळाले. उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने बाजारात कुलर, पंखे यांच्या खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे दिसून आले. दरम्यान, आगामी आठ दिवस शहरात अशीच उष्णतेची लाट राहील. पारा 40 ते 43 अंशांवर जाईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शहरात ढगाळ वातावरण असल्याने गेले काही दिवस किमान तापमानात मोठी वाढ झाली होती. मात्र, मंगळवारपासून ढग दूर झाले अन् दिवसा तापलेले शहर सायंकाळी गार होऊ लागले आहे. आता रात्रीचे तापमान कमी होण्यास मदत होईल.

– अनुपम कश्यपी, निवृत्त शास्त्रज्ञ, पुणे वेधशाळा

ढग गायब होताच किमान तापमानात घट

मंगळवारी शहरावरचे ढगांचे अच्छादन गायब झाले अन् किमान तापमानात किंचित घट होण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी व सोमवारी शहराचे किमान तापमान 26 ते 27.9 अंशांवर गेले होते. वडगाव शेरी, कोरेगावचे किमान तापमान 27.9 अंशांवर होते. मात्र, मंगळवारी ढगाळ वातावरण कमी झाले अन् किमान तापमानात घट दिसून आली.

मंगळवारचे कमाल तापमान

  • लवळे – 41
  • कोरेगाव पार्क – 40
  • शिवाजीनगर – 39.5
  • पाषाण – 40
  • लोहगाव – 40
  • चिंचवड -40
  • मगरपट्टा – 40
  • एनडीए 39

हेही वाचा

Back to top button