Sassoon Hospita l उंदरानेच घेतला रुग्णाचा जीव! रुग्णाच्या नातेवाइकांचा आरोप | पुढारी

Sassoon Hospita l उंदरानेच घेतला रुग्णाचा जीव! रुग्णाच्या नातेवाइकांचा आरोप

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतील ट्रॉमा केअर सेंटरच्या आयसीयूमध्ये सागर रेणुसे या तीस वर्षीय पुरुषाच्या मणक्याला दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याची नोंद झाली. मात्र, आयसीयूमध्ये उंदीर चावल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. रुग्णालय प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली असतानाच तेथील अस्वच्छतेमुळे उंदरांचा प्रादुर्भाव झाल्याचा दावा नातेवाइकांनी केला आहे.

आयसीयूमध्ये दर तीन दिवसांनी कीटक नियंत्रण मोहीम राबवली जाते. तसेच, शनिवारी किंवा रविवारी कीटकनाशक फवारणी केली जाते. त्यामुळे उंदीर, झुरळ किंवा ढेकणांचा प्रादुर्भाव होत नाही, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. रुग्णाच्या शवविच्छेदन अहवालात उंदीर चावल्याच्या जखमा आढळल्या नसल्याचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी सांगितले.

मृत रुग्णाचा मद्यधुंद अवस्थेत असताना 17 मार्च रोजी दुचाकीवरून पडल्याने अपघात झाला. त्याच्या मणक्याला दुखापत झाल्याने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या दोन्ही पायांतील ताकद गेली होती. हातातील संवेदना हरवली होती. वेल्ह्याचा रहिवासी असलेल्या रुग्णाची 25 मार्च रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने 29 एप्रिल रोजी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. दरम्यान, 1 एप्रिल रोजी सकाळी रुग्णाला उंदीर चावल्याची नातेवाइकांनी तक्रार केली. त्याच दिवशी संध्याकाळी रुग्णाचे निधन झाले. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे म्हणाले, जुन्या इमारतीतील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ही घटना घडली. येथील आयसीयूमध्ये 17 खाटा असून, त्यावर नेहमी रुग्ण असतात. इतर कोणत्याही रुग्णाला अशा प्रकारचा त्रास झालेला नाही. आम्ही दर तीन दिवसांनी पेस्ट कंट्रोल आणि आठवड्यातून एकदा आयसीयूबाहेर फ्युमिगेशन करत असल्याने उंदरांचा प्रादुर्भाव होत नाही. रुग्णाच्या शवविच्छेदन अहवालात उंदीर चावल्याचे निदर्शनास आलेले नाही.

उंदीर चावणे, रेबीज किंवा लेप्टोस्पायरोसिसमुळे होणारे कोणतेही संक्रमण ताबडतोब मृत्यूला कारणीभूत ठरत नाही. कारण या संक्रमणांचा उष्मायन कालावधी किमान 3-4 दिवसांचा असतो. रुग्णाची प्रकृती आधीपासूनच गंभीर होती आणि त्याच्यावर व्यवस्थित उपचार सुरू होते.

– डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

सोमवारी सकाळी माझी आई माझ्या भावाला भेटायला आयसीयूमध्ये गेली असता त्याच्या हातावर, डोक्यावर जखमा आढळून आल्या. आईने विचारणा केल्यावर काहीतरी चावल्याचे त्याने हातवारे करून सांगितले. त्याचा अंदाज घेऊन आईने उंदीर चावला का, असे विचारले असता त्याने होकारार्थी उत्तर दिले. जखमांमधून रक्त येत असल्याने आईने लगेच परिचारिकेला सांगितले. त्यांनी आईला कापूस देऊन जखम दाबून ठेवायला सांगितले. रुग्णालयातील अस्वच्छता आणि निष्काळजीपणामुळे माझ्या भावाचा मृत्यू झाला आहे. आम्ही पोलिसांकडेही तक्रार देणार असून, लगेच गुन्हा दाखल करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

– ओंकार रेणुसे, रुग्णाचा भाऊ

हेही वाचा

Back to top button