शिंदे गट-भाजपमधील सहा जागांवरील तिढा सुटता सुटेना | पुढारी

शिंदे गट-भाजपमधील सहा जागांवरील तिढा सुटता सुटेना

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना शिंदे गट आणि महायुतीमध्ये सहा जागांवरील धुसफूस कायम आहे. शिंदे गटाने दिलेले उमेदवार भाजपला मान्य नाहीत, अशी स्थिती आहे. नाशिकमध्ये हेमंत गोडसे तर हिंगोलीत हेमंत पाटील हे शिंदे गटाच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत. हिंगोलीत शिंदेंनी हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करूनही त्यांना भाजपचा विरोध कायम आहे. हिंगोलीतील भाजपचे स्थानिक आमदार आणि पदाधिकार्‍यांनी हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली तर आम्ही काम करणार नाही, असा पवित्रा घेतल्याने त्यांच्या उमेदवारीवर पुनर्विचार सुरू झाला आहे.

आपली उमेदवारी जाऊ शकते याची कुणकुण लागल्याने हेमंत पाटील यांनी आपल्या समर्थकांना घेऊन मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन केले. नाशिकमध्ये हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळू नये म्हणून भाजप प्रयत्नशील आहे. नाशिकची जागा भाजपला मिळावी, असे प्रयत्न स्थानिक नेत्यांचे आहेत. ही जागा छगन भुजबळ यांच्यासाठी मिळावी, असे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुरू आहेत. त्यात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचीही भुजबळ यांना साथ असल्याने गोडसे यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. उमेदवारी धोक्यात असताना हेमंत पाटील आणि हेमंत गोडसे हे दोघेही एकाच गाडीतून मुख्यमंत्र्यांची मनधरणी करण्यासाठी गेले. मात्र, त्यांना शिंदेंनी स्पष्ट काहीही सांगितले नाही. तुमची उमेदवारी राखण्यासाठी मीही प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.

यवतमाळ – वाशिममधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा भावना गवळी यांना तिकीट देण्यासाठी आग्रही असले तरी भाजप त्यांच्या नावाला अनुकूल नाही. त्यांच्याऐवजी मंत्री संजय राठोड यांना भाजपची पसंती आहे. या पार्श्वभूमीवर गवळी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांची मनधरणी केली.

याशिवाय ठाणे, कल्याण, पालघर आणि छत्रपती संभाजीनगर या चार मतदारसंघांवर भाजप आणि शिवसेनेचा वाद कायम आहे. त्यामुळे या जागेचे उमेदवार अद्यापही जाहीर होऊ शकलेला नाहीत. पालघर आणि छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ मिळावा म्हणून दोन्ही पक्ष आग्रही असल्याने या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणाही रखडली आहे.

Back to top button