दौंडमध्ये भागवत, खरात कोणाचे गणित बिघडवणार? शरद पवारांच्या डावाकडे लक्ष | पुढारी

दौंडमध्ये भागवत, खरात कोणाचे गणित बिघडवणार? शरद पवारांच्या डावाकडे लक्ष

उमेश कुलकर्णी

दौंड : लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद-भावजय यांचा सामना होत असल्याने ही लढत लक्षवेधी तर होणारच आहे, परंतु अजित पवारांना आव्हान देणारे विजय शिवतारे यांनी अचानक घेतलेला ‘यू टर्न’ व दौंड मधील ओबीसी नेते महेश भागवत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात हे उमेदवार कोणाचे राजकीय गणित बिघडवणार, त्यांचा फटका नेमका कोणाला बसतो व कोणाला फायदा होतो हे येणार्‍या काळात समजेल. सध्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एरव्ही पवारांना कधीही विरोध न करणारे नेते आता खुलेआमपणे विरोध करू लागले आहेत, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पवारांच्या घरातूनच याची सुरुवात झाली आहे.

शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या मागील 10 वर्षांपासून खासदार असल्याने मतदारांच्या संपर्कात आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या नवख्या उमेदवार असल्या तरी अजित पवारांच्या नावावर त्या आपल्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. शरद पवार यांनी आपल्या मुलीकरिता आपले सर्व राजकीय डाव पणाला लावले आहेत. शरद पवार हे मुरब्बी राजकारणी असल्याने ऐन वेळेस कोणता डाव टाकतात व विरोधकाला कसे चितपट करू शकतात, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागलेले आहे. शरद पवारांचा दौंड तालुक्यातील अनेक जुन्या दिग्गज नेत्यांशी चांगला संपर्क आहे तर अजित पवार यांच्याकडून दुखावले गेलेले नेते व कार्यकर्ते हे नक्कीच येणार्‍या काळात छुप्या पद्धतीने शरद पवार यांचे काम करतील असे दिसते.

मागील 10 वर्षांपासून अजित पवारांनी दौंड तालुक्यात फारसे लक्ष घातलेले नाही. काही ठराविक कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात आहेत. दौंड शहरात व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात व भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांची सध्यातरी दिलजमाई झाली असली तरी कार्यकर्ते ऐन वेळेस काय करतील हे सांगणे कठीण आहे दौंड भाजपमध्ये दोन गट आहेत, त्यांचे एकमेकांशी फारसे काही जमत नसल्याने दौंड तालुक्यात मत विभाजन होणार हे मात्र निश्चित. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांनी कमळ सोडून इतर कोणत्याही पक्षाला आजपर्यंत मतदान केले नाही असे 50 ते 60 हजार मतदार आहेत, त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पवारांना विरोध करणारे कार्यकर्ते व मतदार हे या वेळेस घड्याळाला मतदान करतील का की तुतारीला जवळ करतील हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार तर होईलच, परंतु पाडापाडीच्या राजकारणात नणंद- भावजयीपैकी एकीला फटका बसू शकतो.

दौंडमध्ये सर्वांचाच कस लागणार

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गट-तट आहेत, हेवे-दावे आहेत. मागील काळात दौंडमध्ये जे राजकारण घडले त्याच्यापासून काही समाज त्यांच्यापासून दूर गेलेला आहे. दौंड शहरात मागासवर्गीय, मुस्लिम, ख्रिश्चन समाज हा मोठ्या प्रमाणात असून यांच्या मतांवर बरेच काही राजकीय गणित अवलंबून आहे. कोणता पक्ष त्यांना आपल्याकडे वळवण्यात यशस्वी होतो, हे देखील पाहणे गरजेचे आहे. आज तरी भाजपकडे हा वर्ग आकर्षित होणे कठीणच दिसते. आगामी काळात सर्वांचाच कस दौंडमध्ये लागणार आहे हे मात्र नक्की.

दौंडमध्ये सर्वांचाच कस लागणार

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गट-तट आहेत, हेवे-दावे आहेत. मागील काळात दौंडमध्ये जे राजकारण घडले त्याच्यापासून काही समाज त्यांच्यापासून दूर गेलेला आहे. दौंड शहरात मागासवर्गीय, मुस्लिम, ख्रिश्चन समाज हा मोठ्या प्रमाणात असून यांच्या मतांवर बरेच काही राजकीय गणित अवलंबून आहे. कोणता पक्ष त्यांना आपल्याकडे वळवण्यात यशस्वी होतो, हे देखील पाहणे गरजेचे आहे. आज तरी भाजपकडे हा वर्ग आकर्षित होणे कठीणच दिसते. आगामी काळात सर्वांचाच कस दौंडमध्ये लागणार आहे हे मात्र नक्की.

हेही वाचा

Back to top button