खासदार उन्मेष पाटील संजय राऊतांच्या भेटीला, ठाकरे गटात प्रवेश करणार? | पुढारी

खासदार उन्मेष पाटील संजय राऊतांच्या भेटीला, ठाकरे गटात प्रवेश करणार?

पुढारी ऑनलाइन डेस्क –  लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. त्यातच काही विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाल्याने ते बंडाच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचाही समावेश आहे. पाटील यांना डावलून त्याजागी भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे नाराज असलेले खासदार उन्मेष पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. संजय राऊत यांच्या भेटीसाठी उन्मेष पाटील मुंबईत पोहचल्याने जळगाव मतदारसंघात खळबळ उडाली आहे. दरम्यान संजय राऊतांची भेट घेऊन उन्मेष पाटील हे मातोश्रीवर दाखल झाल्याचीही माहिती आहे. उद्धव ठाकरे यांची ते भेट घेणार आहेत.

भाजपच्या धक्कातंत्रामुळे नाराज 

जळगाव मध्ये रावेर मतदारसंघात रक्षा खडसे यांचे नाव भाजपने कायम ठेवले. मात्र, जळगाव मतदारसंघात भाजपने धक्कातंत्रचा अवलंब केला. जळगावात भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले व माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज असल्याची चर्चा आहे.

पत्नीसह ठाकरे गटात प्रवेशाची शक्यता 

उन्मेश पाटील हे पत्नी संपदा यांच्यासह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. उन्मेश पाटील यांच्या पत्नीला ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचंही बोललं जात आहे. उन्मेश पाटील यांनी भांडुपमधील संजय राऊत यांच्या मैत्री निवासस्थानी भेट घेतली. जळगावचे शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांचीही त्यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्याची माहित आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा :

Back to top button