सोलापूर, नगर मार्गावरील कोंडी कधी संपणार? उड्डाणमार्ग संकल्पना कागदावरच.. | पुढारी

सोलापूर, नगर मार्गावरील कोंडी कधी संपणार? उड्डाणमार्ग संकल्पना कागदावरच..

जयदीप जाधव

उरुळी कांचन : पुणे शहराचे दक्षिणद्वार असलेल्या पुणे -सोलापूर व पुणे-नगर राष्ट्रीय महामार्गावरील हवेली तालुक्याच्या हद्दीत वाहतूक कोंडीचा प्रश्न अतिशय तीव्र झाला आहे. गेली 5 हून अधिक वर्षे उलटून हा जटिल प्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना न झाल्याने वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अपयशच येत आहे. वाहतूक कोंडीचा विळखा या मुख्य मार्गांवर पडला आहे. राज्यकर्ते ही समस्या सोडविण्यासाठी चंदननगर ते शिरूर तसेच हडपसरहून उरुळी कांचनपर्यंत (इलिव्हेटेड रोड) उड्डाणमार्ग करण्याची घोषणा करीत आहे. मात्र प्रत्यक्षात कागदापलीकडे ही घोषणा प्रत्यक्षात उतरली नसल्याने लोकप्रतिनिधींच्या पोकळ आश्वासनांनी जनतेचा पुरता भ्रमनिरास झाला आहे.

पुणे शहराच्या लगत प्रचंड शहरीकरण वाढल्याने पुणे शहराला जोडणार्‍या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या लगतच्या भागातून शहरात जाणार्‍या प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरीकरण वाढताना या भागात बांधकामाला परवानगी देताना, पर्यायी रस्त्यांची व्यवस्था नसताना अधांधुंदीच्या कारभारामुळे मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते कोंढण्यास सुरुवात झाली आहे. या बेधुंदशाहीचा परिणाम आता या ठिकाणी जनता मोजत असल्याची विदारक परिस्थिती आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हडपसर, मांजरी, लोणी काळभोर, उरुळी कांचनपर्यंतचा भाग नेहमीच्या वाहतूक कोंडीने अतिशय त्रस्त झाला आहे. पुणे-नगर राष्ट्रीय महामार्गावर वाघोली, लोणीकंद, पेरणेपासून शिक्रापूरपर्यंतची वाहतूक कोंडी अतिशय जटिल बनली आहे. या भागातून प्रवास करणे म्हणजे वाहनचालकांसाठी एक दिव्य पार करण्यासारखे झाले आहे. या भागातून प्रवास करावा की नाही, अशी अवस्था या ठिकाणी आहे.

पुणे-नगर वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने वाहतूक पोलिस, पर्यायी रस्ते रुंदीकरण तसेच अंतर्गत रस्ते प्रशस्त करण्याचा काही प्रमाणात प्रयत्न केला असला तरी, हा प्रयत्न म्हणजे तात्पुरती मलमपट्टी ठरत आहे. या भागातील वाढत्या नागरीकरणापुढे हे पर्याय तकलादू ठरत असल्याची स्थिती आहे. अशीच परिस्थिती पुणे-सोलापूर महामार्गावरील आहे. या परिसरात मोठ्या गृहप्रकल्पांना परवानगी, अनधिकृतपणे प्लॉटिंग व्यवसायाचा विळखा यामुळे महामार्ग तुंबण्याची परिस्थिती आहे. अशा स्थितीत पुणे-सोलापूर महामार्ग रुंदीकरण सोडाच पण या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी महामार्ग देखभाल दुरुस्ती करण्यासाठी शिफारस करण्याचीही जागरूकता दाखविलेली नाही.

या दोन्ही महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केंद्रीय स्तरापासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घोषणांची सरबत्ती केली आहे. पुणे-नगर मार्गावर उड्डाणमार्ग (एलिव्हेटेड रोड) करण्यासाठी तीन हजार कोंटीचा विकास आराखडा तयार केला आहे. पुणे-सोलापूर महामार्गाला मात्र अद्याप आराखड्याची प्रतीक्षा पूर्ण होऊ शकली नाही, अशा स्थितीत कासवाच्या गतीने वहातूक अशी या मुख्य मार्गांची स्थिती झाली आहे. या उलट शहरी भागातील चांदणी चौक उड्डाणपूल, मुंबई-पुणेचे कॉरिडॉर रस्ते, मुंबईतील प्रकल्पांना राज्यकर्त्यांची खैरात सुरू असताना, या दोन्ही महामार्गावर मात्र भारतमातेचा समावेशापलीकडे कागदी घोडे पुढे जात नसल्याने पुढील पाच वर्षांत नवीन सरकार या भागातील प्रस्थापित प्रकल्प पूर्ण करण्यात वचनबद्धता दाखविणार काय असा सवाल आहे.

हेही वाचा

Back to top button