वेध लोकसभेचे; सेनेला ‘धनुष्यबाण’ देणार्‍या परभणीला बंडखोरीचा शाप | पुढारी

वेध लोकसभेचे; सेनेला ‘धनुष्यबाण’ देणार्‍या परभणीला बंडखोरीचा शाप

उमेश काळे

१९८९ ची निवडणूक शिवसेनेच्यादृष्टीने महत्वाची ठरली. भाजपसोबत युती करून शिवसेनेचे चार खासदार लोकसभेत पोहचले, सेनेला अधिकृत पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आणि धनुष्यबाण हे चिन्हे सेनेला मिळाले. अर्थात संभाजीनगर महापालिकेची पहिली निवडणूक व काही विधानसभा निवडणुका सेनेने धनुष्यबाणावर लढल्या होत्या. आपल्याला राजकीय पक्ष म्हणून

उमेश काळे

मान्यता मिळावी अशी मागणी करणारी कागदपत्रे आयोगाकडे सादर केल्यानंतर चिन्ह मात्र मिळू शकले नाही. कारण त्यासाठी मतांचे प्रमाण ठरलेले असते. (वैध मतांपैकी सहा टक्के मते मिळणार्‍या उमेदवाराने राजकीय पक्षाचा दावा केल्यास) १९८९ निवडणुकीत परभणीतून प्रा. अशोक देशमुख हे धनुष्यबाणावर उभे होते. ते विजयी झ्राल्यानंतर शिवसेनेने केलेल्या धनुष्यबाण चिन्हाला आयोगाने मंजुरी दिली. मराठवाड्यातून संभाजीनगर मतदारसंघात मोरेश्‍वर सावे यांनी बाजी मारली. त्यांचे चिन्ह मशाल होते. याशिवाय विद्याधर गोखले आणि वामनराव महाडिक हे अन्य दोन खासदार या निवडणुकीत निवडून आले. पण परभणीमुळे शिवसेनेला धनुष्यबाण मिळाले. आता एकनाश शिंदे यांची शिवसेना अधिकृत झाल्यामुळे ठाकरे गटाचे चिन्ह गोठविण्यात आले, हा भाग वेगळा.

चार खासदारांची फारकत

१९८९ आणि १९९१ या दोन लोकसभा निवडणुकांत शिवसेनेचे उमेदवार प्रा. देशमुख हे विजयी झाले. देशमुख यांना २,२९,५६९ तर काँग्रेसचे रामराव लोणीकरांना १६३,१८ मते मिळाली. शेकापचे विजय गव्हाणे यांना ८०,३४९ मतांवर समाधान मानावे लागले. १९९१ च्या निवडणुकीत देशमुखांनी जनता दलाचे प्रताप बांगर आणि काँग्रेसचे माणिकराव भांबळे यांना पराभूत केले.कालांतरांने बांगर हे शिवसेनेत आले आणि वैधानिक मंडळाचे अध्यक्षही झाले. १९९१ ला पी. व्ही. नरसिंहराव सरकार सत्तेवर आले. २३२ जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. सर्वात जास्त जागा असणारा पक्ष म्हणून राष्ट्रपतींनी नरसिंहराव यांना शपथविधीसाठी पाचारण केले. परंतु, अल्पमतातील सरकार असल्याने अनेक अडचणी येवू लागल्या. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर तीन वेळा अविश्‍वास ठराव आणला. हे ठराव फेटाळले गेले. कारण छोट्या पक्षांना व खासदारांना पैशांची लालूच दाखवून फोडण्यात आले. झामुमोचे लाच प्रकरण हे त्यावेळी चांगलेच गाजले होते.

एका ठरावाच्या वेळी देशमुख, हिंगोलीचे विलास गुंडेवार या दोन्ही खासदारांनी शिवसेनेच्या व्हिपचे उल्‍लंघन केले. साहजिकच ज्यांच्यामुळे शिवेसेनला धनुष्यबाण चिन्ह मिळाले ते अशोक देशमुख सेनेबाहेर गेले. १९९६ ला सुरेश जाधव, २००४ तुकाराम रेंगे पाटील, २००९ गणेशराव दूधगावकर हे सेनेच्या तिकिटावर निवडून आले. पण कालांतरांने त्यांनीही पक्षाला रामराम केला. जाधव यांनी शिवसेनेला रामराम करीत राष्ट्रवादीत तर रेंगे यांनी काँग्रेसम ध्ये प्रवेश केला. दूधगावकर यांनी सेनेपासून फारकत घेतली. मुळात दूधगावकर यांचा पिंड काँग्रेसचा होता. असे असले तरी परभणीची जनता ही ३० वर्षांपासून शिवसेनेलाच कौल देत आली आहे हे विशेष. २०१४, २०१९ या दोन्ही निवडणुका शिवसेनेचे बंडू जाधव यांनी जिंकल्या. सेनेच्या बळावर निवडून आलेले खासदार पक्षाबाहेर गेल्यानंतर त्यांना परत मूळ प्रवाहात मतदारांनी कधी येऊ दिले नाही.

अ‍ॅड. शिवाजी माने यांनीही पक्ष बदलले

परभणी लगत असणार्‍या हिंगोलीचे विलास गुंडेवार हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांनीही पक्षाशी बंडखोरी केली. गुंडेवार हे तसे भाजपचे कार्यकर्ते. पण मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यानंतर १९९१ ला त्यांना सेनेकडून उमेदवारी मिळाली. गुंडेवार सेनेतून बाहेर पडल्यानंतर १९९६ आणि १९९९ च्या निवडणुकीत अ‍ॅड. शिवाजी माने शिवसेनेकडून खासदार झाले. अभ्यासू व्यक्‍तिमत्वामुळे सेनेच्या थिंक टँकमध्ये त्यांची गणना होऊ लागली. सेनेचे प्रतोद अशी जबाबदारीही त्यांच्याकडे होती. २००४ च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर कळमनुरी विधानसभेला ते उभे होते. तेथे त्यांना यश मिळाले नाही. पक्षातंर्गत गटबाजीला वैतागून त्यांनी शिवसेना सोडली.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व आता भाजप असा त्यांनी प्रवास केला. माने हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे समर्थक आहेत. २००९ ते २०१४ या काळात खासदार राहिलेले सुभाष वानखेडे यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. ते पुन्हा निवडून आले नाहीत. थोडक्यात परभणी, हिंगोली या दोन जिल्ह्यात सेनेची पाळेमुळे खोलपर्यंत असल्याने पक्ष सोडणारे नेते पुन्हा विजयी झाले नाहीत. आता मात्र शिवसेनाच फुटली असल्याने आगामी राजकीय चित्र काय राहणार याविषयी उत्सुकता आहे.

Back to top button