पुणे : सरकारी : कामासाठी लाच स्वीकारण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा लाच स्वीकारणार्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून चांगलीच अद्दल घडवली आहे. लाच स्वीकारणार्यांमध्ये महसूल विभाग आघाडीवर असून, त्यापाठोपाठ पोलिस विभागात मोठ्या प्रमाणात लाचखोरी होत आहे. राज्यात आत्तापर्यंत दाखल गुन्ह्यांमध्ये 14 क्लासवन अधिकारी, 24 द्वितीय श्रेणी अधिकारी, 127 तृतीय श्रेणी, तर 15 चतुर्थश्रेणी कर्मचारी लाचखोरी करताना पकडले गेले आहेत. तर, यामध्ये 51 खासगी व्यक्तींचा सहभाग असल्याने त्यांनादेखील एसीबीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
राज्यातील दाखल गुन्ह्यांचा विचार करता महसूल विभागाची लाचखोरी अव्वल असून, यामध्ये 55 गुन्हे दाखल झाले असून, यामध्ये तब्बल 81 जणांवर एसीबीची कारवाई झाली आहे. यामध्ये क्लासवन तीन, क्लास टू 5, क्लास थ्री 47, तर खासगी व्यक्ती इतर लोकसेवक धरून 21 व्यक्ती लाचखोरीत अडकल्या आहेत. त्यापाठोपाठ 31 पोलिसांवर लाच प्रकरणात कारवाई झाली असून, त्यात तीन क्लासवन अन् तीन क्लास टू, तर 29 क्लास थ्री, तर खासगी व्यक्तींसह 11 जणांवर एसीबीची कारवाई झाली आहे. यानंतर महावितरण 16, पंचायत समिती 15, जिल्हा परिषद 13, महानगरपालिका 7, सार्वजनिक आरोग्य विभाग 6, शिक्षण विभाग 5, वन विभाग 4 अशी कारवाई झाली आहे. ही कारवाई केवळ तीन महिन्यांतील आहे.
लाचखोरीत नाशिक विभाग 39 गुन्ह्यांसह अव्वलस्थानी असून, त्यापाठोपाठ पुणे विभाग 34, संभाजीनगर 30, ठाणे 22, नागपूर 17, अमरावती 15, नांदेड 13, तर मुंबई विभागात 9 जण लाच घेताना सापळ्यात अडकले आहेत.
2023 मध्ये महसूल विभाग लाचखोरीत 199 गुन्ह्यांसह पहिला, पोलिस 144, महावितरण 47, महानगर पालिका 43, जिल्हा परिषद 36, पंचायत समिती 80, वन विभाग 16, जलसंपदा 13, सार्वजनिक आरोग्य विभाग 21, कृषी विभाग 17 हे आघाडीवर होते.
हेही वाचा