पुणेकरांनो काळजी घ्या! तीन दिवस उष्ण रात्रींचा अलर्ट | पुढारी

पुणेकरांनो काळजी घ्या! तीन दिवस उष्ण रात्रींचा अलर्ट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रविवारी 31 मार्च रोजी शहरात कमालीचा उकाडा जाणवत असल्याने पुणेकरांनी अख्खा दिवस कुलरसमोर बसून घालवला. बाहेर पडलेल्या लोकांनी मात्र पातळेश्वर लेणी, बागेतील दाट झाडांच्या खाली थांबणे पसंत केले तर तरुणाईने शीतपेयांच्या स्टॉलवर धाव घेतली. रविवारी शहराचे कमाल तापमान 39, तर किमान तापमानाचा पारा 23 ते 27 अंशांवर गेला होता. यंदाचा मार्च महिना पुणेकरांना अतिशय उष्णतेचा गेला. 20 मार्चपासून शहरात अंगाची लाही लाही करणारी उष्णतेची लाट सक्रिय झाली. ती 31 मार्चपर्यंत कायम होती. 30 मार्च रोजी तर कमाल तापमानाने यंदाच्या हंगामातील विक्रमी तापमानाची नोंद केली.
वडगावशेरी भागातील किमान तापमान 27.3 अंशांवर गेले होते. शहरात भरदुपारी कडक उन्हात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे दिवसभराची उष्णता सायंकाळी अन रात्री बाहेर पडत नाही. ढगांच्या अच्छादनामुळे रात्रीचे तापमान वाढले आहे. किमान तापमानाचा पारा 26 ते 27. 3 अंशांवर आहे. तर कमाल तापमान 39 ते 41 अंशांवर जात आहे. त्यामुळे यंदाचा मार्च गेल्या दहा ते पंधरा वर्षांतील सर्वात उष्णतेचा  ठरला आहे.

आगामी आठवडा कडक उन्हाचा

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आगामी एप्रिल महिना मार्चपेक्षाही उष्ण राहणार आहे. 1 ते 5 एप्रिल पर्यंतच्या अंदाजात शहराचे कमाल तापमान 40 ते 42 अंशांवर जाणार असल्याचा अंदाज दिला आहे.

लेणी, झाडी अन् शीतपेयांची ओढ

रविवारी पुणेकरांनी घरातील कुलरसमोर बसूनच आराम करणे पसंत केले. सायंकाळी 6 नंतर शहरातील विविध उद्याने अन् टेकड्यांकडे फिरायला जाणा-यांची गर्दी दिसली. तोवर भरदुपारी वाहतूक मंदावली होती. जंगली महाराज रस्त्यावरील पाताळेश्वर लेणीत तरुणाई अभ्यास करताना दिसली तर ज्येष्ठ नागरिक गारव्याचा आधार घेताना दिसले. तर पर्यटक अन् पांथस्थांनी बागेतील झाडाखाली आराम करणे पसंत केले. तरुणाई विविध प्रकारची शीतपेये घेताना दिसत होती.

रविवारचे शहराचे कमाल तापमान..

 कोरेगाव पार्क 40, लवळे 39, मगरपट्टा 39, शिवाजीनगर 38, पाषाण 38, चिंचवड 38, एनडीए 38
अजून दोन ते तीन दिवस शहरात ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे दुपारी उष्मा प्रचंड वाढेल. तसेच किमान तापमानात वाढ होईल. रात्रीच्या वेळी वाऱ्याचा वेग कमी आहे आणि ढगांमुळे उष्णता बाहेर पडायला जागा नाही. त्यामुळे शहरात रात्री कमालीचा उष्मा जाणवत आहे. यंदाचा मार्च गेल्या काही वर्षांतील सर्वात उष्ण ठरला आहे.
– डॉ. अनुपम कश्यपी,  हवामान विभागप्रमुख, पुणे वेधशाळा
हेही वाचा

Back to top button