कांदा काढणीसाठी शेतकर्‍यांची लगबग.. | पुढारी

कांदा काढणीसाठी शेतकर्‍यांची लगबग..

बावडा : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील कांदा पिकाच्या काढणीची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या बाजारात कांद्याचे दर घसरल्याने उत्पादक शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. रोपे लावून तसेच वाफा पद्धतीने शेतकर्‍यांनी कांदा पिकाची लागवड केली आहे. तसेच, अनेक शेतकर्‍यांनी ऊस, मोसंबी व इतर फळबागांमध्ये कांद्याचे आंतरपीक घेतले आहे, अशी माहिती प्रगतिशील शेतकरी भारत लाळगे (सराफवाडी), सागर सवासे (बोराटवाडी), राहुल कांबळे (खोरोची), हरिश्चंद्र काकडे व रमेश काकडे (बावडा) यांनी दिली.

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीची मुदत वाढवल्याने बाजारामध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. कांद्याचे भाव सरासरी 10 ते 12 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत, त्यामुळे कांद्याचा उत्पादन खर्च भरून निघेल की नाही, याची काळजी असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी अनंतराव पाटील (बावडा) यांनी सांगितले. रब्बी हंगामातील कांदा सध्या काढणीस तयार झाला आहे. काढलेला कांदा पातीसह शेतात साधारण आठवडाभर वाळवला जात आहे. त्यानंतर कांद्याची पात व मुळ्या कापून, कांदा सुकवून नंतर कांदा गोण्यांमध्ये भरला जात आहे. दरम्यान, सध्या कांदा काढणीसाठी  तीव्र उन्हाचा शेतमजुरांना त्रास होत आहे.

हेही वाचा

Back to top button