

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर मतदारसंघात दोन्ही माजी खासदारांविरुध्द लढण्यासाठी पर्यायी उमेदवार नसावा का? आत्तापर्यंत होऊन गेलेल्या खासदारांनी देखील मतदारसंघात खूप मोठी ठळक कामे केली नाहीत. खासदार आमच्या गावाकडे, वस्तीकडे कधी फिरकलेच नाहीत, अशीही चर्चा विशेषतः आदिवासी पट्ट्यातील मतदारांमध्ये ऐकू येत आहे, मग एखादा वेगळा पर्याय चालू शकेल काय? हा एक चिंतनाचा विषय बनला आहे. विद्यमान खासदारांनी मतदारसंघात नेमकी कोणती विकासकामे व प्रकल्प आणले आहेत याचाही ऊहापोह होणे महत्त्वाचे आहे. पुरस्कारांनी जनतेच्या समस्या सुटतील का? भाषणबाजीने कोणतेही प्रश्न सुटत नसतात. त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा खूप महत्त्वाचा असतो.
मिळालेला खासदार निधी मतदारसंघात शंभर टक्के वापरला की, परत गेला आहे. मतदारसंघात कोणत्या गावात कोणती योजना राबविण्यात आली. दत्तक घेतलेल्या कोपरं- मांडवे गावातील आदिवासी महिलांची पाण्यासाठी वणवण नक्की थांबली का, त्यांच्या डोक्यावरचा हंडा उतरला का, हे आवलोकन आवश्यक ठरणार आहे. पुणे- नाशिक रेल्वेचे तसेच माळशेज रेल्वेचे घोडे नेमके कुठे अडले? रस्ता वाहतुकीचे काय ? गेल्या काही वर्षांपासून मतदारसंघातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थकि संकटात सापडून पूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. निर्यात बंदी उठवण्यासाठी इतर खासदारांना बरोबर घेऊन दिल्लीत एखादे आंदोलन का छेडले नाही, असे अनेक प्रश्न मतदारसंघात आ वासून उभे आहेत.
शिरूर, खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील शेतकर्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे खेड तालुक्यात मंजूर झालेले विमानतळ पुरंदर तालुक्यात कसे गेले, याला जबाबदार कोण, हे विमानतळ जर खेड तालुक्यात झाले असते तर शेतकर्यांना शेतमाल, फळे व फुले निर्यातीस सोयीस्कर ठरले असते. बैलगाडा शर्यत नक्कीच शेतकर्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, शेतकर्यांच्या पोटापाण्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा व गंभीर आहे. कामगारांचा प्रश्नही तितकाच महत्त्वपूर्ण आहे. तीन एमआयडीसीमुळे कामगारांची संख्या खूपच मोठी आहे. आयुष्यभर पगारातून प्रॉव्हिडंट पेन्शन फंडात रक्कम जमा करूनही दोन- तीन हजार रुपयांच्या एझड-95 पेन्शनवर बोळवण करण्यात येत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत गुबूगुबू नंदी की, मिठूमिठू पोपट निवडून द्यायचा, अशा उपमा सोशल मीडियावर एकमेकांना बहाल केलेल्या आहेत. एखादा सर्वसामान्य सक्षम मराठा आरक्षण समर्थक, शेतकरी, कामगार अथवा पत्रकार असा पर्याय निवडायचा हे आगामी काळात मतदारच ठरवतील, असे अनेक पर्याय शिरूर लोकसभेच्या सोशल मीडियावर झळकू लागले आहेत. शिरूर मतदारसंघात प्रचारात आघाडी मिळवताना गुबूगुबू नंदी आणि मिठूमिठू पोपट या पदव्यांमुळे मतदारांचे मनोरंजन होत आहे.
हेही वाचा