

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याने त्याचा नागरी जीवनावर परिणाम होऊ लागला आहे. शेती पिके आणि जनावरांना त्याची झळ पोहोचू लागली आहे. दौंड तालुक्यात अनेक गावांकडून टँकरची मागणी केली जात आहे. या दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा प्रश्नांवरील उपाययोजना करताना प्रशासनाची दमछाक होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दौंड तालुक्यात खोर, यवत, जिरेगाव, पडवी आदी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू झाले आहेत. स्वामी चिंचोली गावाने टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव दौंडचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्याकडे पाठविला आहे. तालुक्यात बुधवारी (दि. 27 ) तब्बल 42 डिग्री तापमानाची नोंद झाली. सध्या मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. यापुढे एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत उन्हाची दाहकता मोठ्या प्रमाणात असते. सध्या धरणातील पाण्याचा साठा दोन महिने पुरले इतका आहे.
तालुक्यातील माटोबा, व्हिटोरिया हे दोन मोठे साठवण तलाव आहेत. खामगाव हद्दीतील एक आणि दौंड शहराच्या पिण्याचा पाण्याचा एक असे दोन छोटे तलाव आहेत. सध्या वरवंड तलावात पाणीसाठा तोकडा असल्याने त्याचा फटका कुरकुंभ एमआयडीसी आणि परिसरातील गावांना बसू लागला आहे. कुरकुंभ एमआयडीसी पाण्याची तीव टंचाई जाणवत आहे. परिसरातील गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागत आहे. मार्च महिन्यात पाणीसमस्या गंभीर बनली आहे. पुढील दोन महिन्यांचा कडक उन्हाळा बाकी असल्याने हा काळ प्रशासनासाठी कसोटीचा ठरणार असल्याचे दिसून येते.
हेही वाचा