बारामती तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट; 9 गावांना 10 टँकरने पाणी | पुढारी

बारामती तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट; 9 गावांना 10 टँकरने पाणी

बारामती : पुढारी वृत्तसेवा : गतवर्षी पावसाने अपेक्षित साथ न दिल्याचा परिणाम मार्चअखेरीस बारामती तालुक्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यात पाणीटंचाईचे सावट अधिक गडद होऊ लागले आहे. सध्या तालुक्यातील 9 गावांना 10 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तरडोली, मासाळवाडी, भिलारवाडी, जळगाव कडेपठार, बाबुर्डी, पानसरेवाडी, गोजुबावी, माळवाडी लोणी व देऊळगाव रसाळ या गावांचा यामध्ये समावेश आहे.

तालुक्यात साधारणतः 350 मिलीमीटर पाऊस सरासरी धरला जातो. पण गतवर्षीच्या पावसाचा आढावा घेतला तर एकाच दिवसात तालुक्यात सुमारे 125 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर कधी 2 मिलीमीटर, तर कधी 10 मिलीमीटर असा पाऊस झाला. त्यामुळे आकडेवारी जुळली. पण प्रत्यक्षात जमिनीची तहान त्यामुळे भागली नाही. दुसरीकडे विहिरी, कुपनलिका, ओढे, नाले यांची पाणीपातळी त्यामुळे फारशी वाढू शकली नाही. एका दिवसात ढगफुटीसारखा झालेला पाऊस वाहून गेला. परिणामी, जमिनीत पाणी मुरलेच नाही.
तालुक्यात सध्या बागायती भागात निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू आहे. त्यामुळे पाण्याची फारशी चिंता नाही. परंतु जिरायत भाग आता पाण्यावाचून होरपळू लागला आहे. तालुक्यात जून महिन्यात क्वचितच पाऊस पडतो. तत्पूर्वी वळवाचा पाऊस झाला तरी त्याने पाण्याचा प्रश्न सुटत नाही. पाऊस पडण्यासाठी जुलैची वाट बघावी लागणार आहे. तोपर्यंत उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.

बारामती तालुक्यात पाण्याची समस्या बिकट झाली आहे. त्यात गेल्या 8 दिवसांत उन्हाची तीव—ता अचानक प्रचंड वाढली आहे. परिणामी, जिरायती भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. मोरगाव व परिसरातही पाणीटंचाई आहे. या भागाला पुरंदर उपसा सिंचन योजनेतून पाणीपुरवठा होतो. सध्या सुपे येथील तळ्यात पाणी आहे. त्यामुळे आम्ही या योजनेद्वारे उलट पद्धतीने सुप्याकडून मोरगावकडे पाईप लाईनने पाणी नेण्याचा प्रयत्न करत आहोत.

– डॉ. अनिल बागल, गटविकास अधिकारी, बारामती.

हेही वाचा

Back to top button