पुण्यात दहशतखोर घटनांचा टक्का वाढला; टोळक्याकडून तिघांना मारहाण | पुढारी

पुण्यात दहशतखोर घटनांचा टक्का वाढला; टोळक्याकडून तिघांना मारहाण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात दहशत माजविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. वडारवाडी भागात टोळक्याने चार वाहनांची तोडफोड करून दहशत माजविण्याच्या घटना घडल्या, तर एनडीए रस्त्यावरील कोंढवे- धावडे परिसरात टोळक्याने तिघांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना धुळवडीच्या दिवशी (दि.25) घडली. याप्रकरणी व्यंकटेश ऊर्फ वैंक्या साठे (रा. पठाणवस्ती, जुनी वडारवाडी), रियाज शेख (रा. बसवेश्वर मठाजवळ, जुनी वडारवाडी) यांच्यासह चार ते पाच जणांविरुद्ध गु्न्हा दाखल केला. त्यातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. याबाबत सनी अर्जुन कुर्‍हाडकर (वय 34, रा. विटकर बंगल्यासमोर, जुनी वडारवाडी) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोमवारी (25 मार्च) रात्री साडेनऊच्या सुमारास साठे, शेख यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी दहशत माजविली. या भागातील आम्ही दादा आहोत, अशी धमकी देऊन कोयते उगारले. परिसरात लावलेल्या चारदुचाकींची तोडफोड करून आरोपी पसार झाले. मद्यप्राशन करून टोळक्याने ही तोडफोड केल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक केकाण तपास करत आहेत. तर एनडीए रस्त्यावरील कोंढवे-धावडे परिसरात सोमवारी (25 मार्च) रंग लावण्याच्या कारणावरून टोळक्याने तिघांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यातील काही जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत श्रीयश ऋषिकेश कडव (वय 24, रा. भैरवनाथनगर, कोंढवे-धावडे) याने उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. श्रीयश त्याचे मित्र अनिकेत देवीकर, संग्राम मोरे, प्रणित चोरगे यांच्यात रंग खेळण्यावरून वाद झाला. त्या वेळी आरोपींनी चौघांना बांबू तसेच फावड्याने बेदम मारहाण केली. पोलिस उपनिरीक्षक कुरेवाड तपास करत आहेत.

हेही वाचा

Back to top button