वर्षभरानंतर मालवाहतुकीचे उड्डाण : फेब्रुवारीत पाच मेट्रिक टन मालवाहतूक | पुढारी

वर्षभरानंतर मालवाहतुकीचे उड्डाण : फेब्रुवारीत पाच मेट्रिक टन मालवाहतूक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे विमानतळावरून करण्यात येणारी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक गेल्या वर्षभरापासून बंद होती. अखेर फेब—ुवारी महिन्यापासून या मालवाहतुकीला सुरुवात झाली असून, एकाच महिन्यात पाच मेट्रिक टन म्हणजेच पाच हजार किलोची थेट परदेशात मालवाहतूक केली आहे. पुणे विमानतळावरून देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होत आहे. या प्रवासी वाहतुकीसोबतच विमानतळ प्रशासनाकडून मालवाहतूक करण्याला देखील प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र, गेल्या वर्षभरात पुणे विमानतळावरून फक्त देशांतर्गत मालवाहतूक सुरू होती, तर आंतरराष्ट्रीय मालवाहतूक बंद होती.

यामुळे पुणेकरांना थेट परदेशात माल पाठविणे अवघड होत होते. अखेर या मालवाहतुकीला सुरुवात झाली असून, एकाच महिन्यात विमानतळ प्रशासनाने पाच हजार किलो म्हणजेच पाच मेट्रिक टनाची मालवाहतूक केली आहे. यामुळे पुणेकरांना परदेशात मालवाहतूक करण्यासाठी दिलासा मिळाला असून, आगामी काळात देखील नवीन टर्मिनलमुळे येथील मालवाहतुकीला मोठा हातभार लागणार आहे.

मागील वर्षात 55 मेट्रिक टन मालवाहतूक

पुणे विमानतळावरून मागील आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये पुणे विमानतळावरून 55 मेट्रिक टन म्हणजे 55 हजार किलोची आंतरराष्ट्रीय मालवाहतूक झाली होती. त्यानंतरच्या कालावधीत पुणे विमानतळावरील आंतरराष्ट्रीय मालवाहतूक थांबली होती. नवीन वर्षात पुणे विमानतळावरील मालवाहतूक फेब्रुवारी 2024 मध्ये पुन्हा सुरू झाली आहे.

34,845 मेट्रिक टनची देशांतर्गत मालवाहतूक

पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीपेक्षा मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत मालवाहतूक केली जात आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये पुणे विमानतळावरून 34 हजार 845 मेट्रिक टनची म्हणजे 3 कोटी 48 लाख 45 हजार किलो मालाची देशांतर्गत वाहतूक करण्यात आली आहे. यामुळे पुणे विमानतळ प्रशासनासह पुण्यातील व्यापार्‍यांना दिलासा मिळाला आहे.

टर्मिनलसाठी मालवाहतूक बंद

भारतीय हवाई दलाने पुणे विमानतळ प्रशासनाला नवीन कार्गो टर्मिनल उभारण्यासाठी मोठी मदत केली आहे. येथीलच जुन्या विमानतळ टर्मिनल लगतची 1.76 एकर जागा हवाईदलाने विमानतळ प्रशासनाला कार्गो टर्मिनल बनविण्यासाठी दिली. त्याच जागेवर विमानतळ प्रशासनाने प्रशस्त असे नवीन कार्गो टर्मिनल उभारले आहे. ते उभारण्यासाठी, त्यासोबतच सर्व कामकाज यंत्रणा शिफ्टिंगसाठी आणि कस्टम (सीमा शुल्क) विभागाच्या विविध परवानग्या मिळेपर्यंत येथील आंतरराष्ट्रीय मालवाहतूक वर्षभरापासून बंद होती. ती अखेर सुरू झाली आहे.

हेही वाचा

Back to top button