’द़ृश्यम’ स्टाईलने तरुणाच अपहरण; नंतर केलं थरकाप उडविणारं कृत्य | पुढारी

’द़ृश्यम’ स्टाईलने तरुणाच अपहरण; नंतर केलं थरकाप उडविणारं कृत्य

चाकण : पुढारी वृत्तसेवा : महाळुंगे (ता. खेड) येथून बेपत्ता झालेल्या तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘दृश्यम’ चित्रपटाला शोभेल अशा प्रकारे आरोपींनी तरुणाचा मोबाईल एका दिशेला आणि मृतदेह दुसर्‍या दिशेला गुजरात राज्यात नेत जाळला. मात्र, चाकण आणि महाळुंगे पोलिसांनी तपास करून या घटनेची अखेरीस उकल केली. अर्धवट जळालेला मृतदेह व एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आदित्य युवराज भांगरे (वय 18, रा. महाळुंगे, ता. खेड) असे अपहरण करून खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अमर नामदेव शिंदे (वय 25, रा. कासार आंबोली, ता. मुळशी) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात रासे फाटा येथील मराठा हॉटेलमध्ये स्वप्निल ऊर्फ सोप्या शिंदे याच्यावर गोळीबार झाला होता.

या गुन्ह्याच्या तपासात चाकणचे सहायक पोलिस निरीक्षक प्रसन्न जराड व डीबी पथकाने मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून अमर नामदेव शिंदे याला शनिवारी (दि. 23) ताब्यात घेतले. चौकशीत अमरने सांगितले की, रेकॉर्डवरील आरोपी राहुल संजय पवार (रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड) याचा भाऊ रितेश पवारचा 4 महिन्यांपूर्वी 26 नोव्हेंबर 2023 रोजी महाळुंगे हद्दीत कोयत्याने वार करून खून झाला. या खुनामध्ये स्वप्निल शिंदे याचा सहभाग असल्याच्या संशयावरून राहुल पवार व अभिजित दयानंद मराठे (रा. कोथरूड, पुणे) या दोघांनी 18 मार्च 2024 रोजी रात्री साडेदहा वाजता स्वप्निल शिंदेवर गोळीबार केला. दरम्यान तपास पथकाने याबाबत अधिक चौकशी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली.

रितेशच्या खुनानंतर त्याच्या चेहर्‍याचे छिन्नविछिन्न फोटो आदित्य भांगरेने इंस्टाग्रामवर वारंवार सोशल मीडिया अ‍ॅपवर स्टेटसला ठेवले होते. त्यामुळे राहुल पवार याच्या मनात आदित्यबाबत राग होता. त्यातूनच राहुलने आदित्यच्या खुनाचा कट रचला. स्वतः अमर शिंदे आणि त्याचा साथीदार राहुल पवार व अन्य दोन आरोपींनी मिळून दि. 16 मार्च दुपारी आदित्यचे चारचाकीतून अपहरण केले. आदित्यला बेदम मारहाण केली व वायरने गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. महाळुंगे हद्दीतील घटना असल्याने चाकण पोलिसांनी आरोपी अमर शिंदेला महाळुंगे पोलिसांच्या ताब्यात दिले. आता या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोध चाकण व महाळुंगे एमआयडीसी पोलिस घेत आहेत. एका खुनाच्या बदल्यासाठी आणखी खून असा गुन्हेगारीचा ट्रेंड चाकण भागात रुजू लागला आहे. अशा घटनांनी चाकण औद्योगिक भागात गुन्हेगारी वाढली असून सामान्य नागरिक दहशतीत आहेत.

आदित्य दि. 16 मार्चपासून बेपत्ता असल्याची तक्रार

महाळुंगे पोलिस ठाण्यात आदित्य भांगरे हा दि. 16 मार्चपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या आईने दिली होती. महाळुंगे आणि चाकण पोलिसांनी केलेल्या तपासात आदित्य भांगरे याचे अपहरण केल्यानंतर खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आदित्यचा मृतदेह गुजरात राज्याच्या हद्दीतून अर्धवट जळालेल्या स्थितीत पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

हेही वाचा

Back to top button