‘इथे’ पोलिस चक्क रेड्यावर बसून घालतात गस्त! | पुढारी

‘इथे’ पोलिस चक्क रेड्यावर बसून घालतात गस्त!

ब्राझिलिया : ब्राझीलमधील उत्तर भागात जिथे अमेझॉन नदी अटलांटिक महासागराला मिळते, तिथे ‘माराजो’ नावाचे एक बेट आहे. स्वित्झर्लंडच्या आकाराचे हे बेट अतिशय सुंदर व जैवविविधतेने नटलेले आहे. मात्र तेथील एक विचित्र पद्धत लोकांचे लक्ष वेधून घेण्यास अधिक कारणीभूत ठरते. ही पद्धत पोलिसांच्या गस्त घालण्याची आहे. तिथे पोलिस चक्क रेड्यावर बसून गस्त घालतात!

याठिकाणी लष्करी पोलिस दुचाकी गाडीवरून, चारचाकी गाडीतून किंवा घोड्यावर बसून गस्त घालत असताना दिसत नाहीत. त्याऐवजी ते चक्क रेड्यांचा वापर करतात! ‘एशियन वॉटर बफेलोज’ या प्रजातीचे हे आशियाई रेडे त्यांना यासाठी सोयीचे वाटतात. हीच प्रजाती भारतात आढळते व आग्नेय आशियातील अनेक देशांमध्येही आढळते. आता कल्पना करा की, आपल्याकडे जे रेडे दिसतात तशाच रेड्यावर बसून हे पोलिस तेथील रस्त्यांवर फिरत आहेत! हे आशियाई रेडे या बेटावर कसे पोहोचले हेसुद्धा गौडबंगालच आहे. काहींच्या मते, बेटाच्या किनार्‍याला एक जहाज धडकले होते व त्यामधील रेडे या बेटावर आले.

काहींच्या मते फ्रेंच गयानामधील तुरुंगातून पळून आलेल्या कैद्यांनी आपल्यासमवेत हे रेडे आणले. काही का असेना, पण हे आशियाई रेडे आता तिथे चांगलेच रुळले आहेत. तेथील वातावरणात ते मिसळून तिथलेच झाले आहेत! आता त्यांची संख्या चांगली 5 लाखाच्या आसपास आहे. विशेष म्हणजे बेटावरची मानवी लोकसंख्या 4,40,000 आहे. याचा अर्थ तिथे सध्या माणसांपेक्षा रेडे, म्हशीच अधिक झाले आहेत! त्यांना आता बेटावरील लोकांच्या संस्कृतीमध्ये आणि आर्थिक क्षेत्रातही महत्त्वाचे स्थान आहे. हे रेडे वेगवेगळ्या प्रकारचे काम करतात.

मात्र त्यापैकी सर्वात भन्नाट काम म्हणजे पोलिसांचे गस्त घालण्याचे! 19 व्या शतकात अमेरिकन सैनिकांनी या पोलिसांना ‘बफेलो सोल्जर्स’ असे नाव दिले होते. या रेड्यांच्या पाठीवर विशेष खोगीर घालून त्यावर हे पोलिस बसलेले असतात. त्यांचा वापर होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ज्यावेळी पुरामुळे बेटावरील रस्त्यांमध्ये चिखल होतो, त्यावेळी वाहने किंवा घोड्यांच्या तुलनेत ही सवारी उपयुक्त ठरते. चिखलातून वाट काढणे रेड्यांना चांगले जमते व ते अशा वेळी वेगानेही चालू शकतात. आता रेड्यावरून गस्त ही या बेटाची एक ओळख बनली असून पर्यटकांचे एक आकर्षणही बनलेले आहे!

Back to top button