Fire accident : रांजे येथील रंगाच्या कंपनीला भीषण आग : लाखो रुपयांचे नुकसान | पुढारी

Fire accident : रांजे येथील रंगाच्या कंपनीला भीषण आग : लाखो रुपयांचे नुकसान

खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : शिवापूर ते कोंढणपूर यादरम्यान असलेल्या रांजे (ता. भोर) येथील टप कोट या रंगाच्या कंपनीला बुधवारी (दि. २७) आग लागली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी समजते आहे. त्याचप्रमाणे सभोवताली असलेल्या कंपन्या देखील या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या आहेत. रांझे (ता. भोर) ग्रामपंचायतीच्या हद्दीत टपकोट नावाची रंग तयार करण्याची कंपनी आहे. त्या कंपनीला बुधवारी साधारण साडे दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. रंगाची कंपनी असल्यामुळे केमिकल व इतर ज्वलनशील पदार्थ कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात होते.

त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले, त्याचप्रमाणे या आगीमुळे त्याच्या शेजारील असलेल्या कंपनींना देखील आग लागली आहे. घटनास्थळावर ग्रामसेवक भूषण पुरोहित यांच्यासह राजगड पोलीस दाखल झाले असून अजूनही आगीचे बंब दाखल झाले नसल्याने आगीने शेजारील दोन कंपन्या आपल्या कवेत घेतल्या आहेत.

याबाबत भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी तातडीने पाण्याचे बंब लागतील तेवढे त्वरित पाठवण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला दिले आहे. कंपनीच्या शेजारी असलेल्या चितळे बंधू कंपनीच्या इंद्रनील चितळे यांनी सांगितले की, मी स्वतः फायर ब्रिगेडशी संपर्क साधला आहे. त्याचप्रमाणे आम्हीही जे काही सहकार्य असेल ते करू, असे सांगितले.

या भागात पूर्वीही आगीच्या घटना

यापूर्वी भागात आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या, त्यावेळी राजगड पोलिसांनी कंपनी चालकांची बैठक घेऊन सर्वात मिळून एक आगीचा बंब खरेदी करावा असा सल्ला किंबहुना आदेश दिला होता; मात्र त्याकडे सर्वच कंपनी चालकांनी दुर्लक्ष केले असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा

Back to top button