

जळगाव- लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवारी जाहीर करण्यात भाजपने आघाडी घेतलेली आहे. त्यानंतर महाविकास आघाडी मधून प्रथमच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र या यादीत जळगाव जिल्ह्याचा उल्लेख ही नाहीये. ज्या जळगाव जिल्ह्याने शिवसेनेला एक नवीन स्थान दिले होते. त्या जिल्ह्यात उमेदवार शोधण्याचे काम अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना करत आहे. पुन्हा निष्ठावंतांना डावलून आयात केलेला उमेदवार देणार की काय हे पाहावे लागणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील उमेदवार जाहीर करण्यात महाविकास आघाडी खूप वेळ घेत आहे. मात्र राष्ट्रीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने जळगाव जिल्ह्यातील दोन्ही उमेदवार महिलांना संधी दिलेली आहे. यामागील कारणे अनेक असू शकतात मात्र रावेर लोकसभेचा विचार केला असता रक्षा खडसे यांना संधी देऊन भाजपाने एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढ केली आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना सुने समोर उभे करून दिलेले आहे.
तर महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 17 उमेदवार (दि. 27) रोजी जाहीर झालेले आहेत. या यादीमध्ये जळगाव जिल्ह्याचा नंबर नसल्यामुळे जळगाव लोकसभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा उमेदवार कोण हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
उबाठा शिवसेनेने इच्छुकांची यादी मोठी जरी नसली तरी या यादीमध्ये जिल्हाप्रमुख काही निष्ठावंत कार्यकर्ते यांची नावे चर्चेमध्ये आहे. मात्र असे असतानाही एक नाव पुन्हा चर्चेत आलेले आहे. हे नाव भाजपाच्या खासदाराच्या पत्नीचे आहे. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला पुन्हा आयात उमेदवार द्यावा लागणार आहे. कारण इच्छुक असलेल्या एडवोकेट ललिता पाटील सुद्धा भाजपाला रामराम करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत आलेल्या आहेत. जळगाव लोकसभेच्या उमेदवार तो कि ती हा जरी प्रश्न असला तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मशाल कोणाच्या हाती जाणार हे पाहावे लागेल.