पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने महिलेची दहा लाख 69 हजार 575 रुपयांची फसवणूक करण्यात आली. वाकड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यात सायबर सेलने चौघांना अटक केली आहे. पोलिस तपासात या प्रकरणाचे बँकॉक कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. विकास नेमीनाथ चव्हाण (43, रा. गणेशनगर, नवी सांगवी), प्रदीप कृष्णा लाड (32, रा. पिंपळे गुरव, सांगवी), अमित जगदीशचंद्र सोनी, अहमद नजीर गाझी, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील एक महिला फेसबुकवर पोस्ट बघत असताना तिला आयबीकेआर क्रेसेट अकादमी गोल्डमन सच, या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप दिसला.
त्यावर क्लिक केले असता महिला ग्रुपला जॉईन झाली. ग्रुपमध्ये असलेल्या सदस्यांना दररोज गुंतवणुकीवर नफा होत असल्याचे फिर्यादी यांना दिसले. त्यामुळे महिलेने देखील आयबीकेआर सेक्युरिटीज या कंपनीत पैसे गुंतवण्याची तयारी दर्शवली. दरम्यान, आरोपींनी महिलेला लिंक पाठवून एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यावर महिलेने केलेली गुंतवणूक आणि नफा दिसत होता. मात्र, महिलेला पैसे काढता येत नव्हते. आपली फसवणूक होत असल्याचे महिलेच्या लक्षात आले. महिलेने वाकड पोलिसात धाव घेत दहा लाख 69 हजार 575 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली. यांनी केली कामगिरी पोलीस उप-आयुक्त संदिप डोईफोडे, सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे,
सहायक पोलिस निरीक्षक सागर पानमंद, सहायक पोलिस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलिस उपनिरीक्षक सागर पोमन, पोलिस अंमलदार अतुल लोखंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
आरोपी अहमद याचा सख्खा भाऊ आबिद आणि मुफ्दल हे दोघे बँकॉकमध्ये राहतात. दोघेही आंतराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीसोबत काम करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींनी आत्तापर्यंत सहा खात्यांतील पैसे काढून रोख रक्कम 'युएसडीटी'मध्ये बँकॉकला पाठविल्याचे समोर आले आहे. आरोपीच्या एकूण सहा बँक खात्याविरोधात भारतामध्ये एकूण 177 तक्रारी अर्ज पोलिसांकडे आले आहेत. यामध्ये तब्बल 100 कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाली आहे.
हेही वाचा