पुणे : सुनील जगताप : विविध खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या खेळाडूंसह क्रीडा मार्गदर्शक यांना महाराष्ट्र शासन आणि क्रीडा विभागाच्या वतीने शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले जाते. परंतु, क्रीडा खात्याकडून नियमांमध्ये केलेल्या बदलांचा प्रस्ताव मंत्रालयामध्ये पाठविण्यात आला असून त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती क्रीडा खात्यातील वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, खेळाडू व संघटक, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार, साहसी क्रीडा आणि जिजामाता क्रीडा पुरस्कार असे विविध पुरस्कार दिले जात असतात. दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने हे पुरस्कार जाहीर होत असतात. सन 1969 ते 70 पासून हे शिवछत्रपती पुरस्कार सुरू करण्यात आले असून उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्याची योजना सन 1988-89 पासून अंमलात आणली आहे. सन 2019-20 साली दिल्या गेलेल्या शिवछत्रपती पुरस्कारावेळी नियमावलीमध्ये बदल करण्याबाबतची चर्चा करण्यात आली होती.
क्रीडा विभागाच्या वतीने जानेवारी 2021 मध्ये शिवछत्रपती पुरस्कार जाहीर करण्यापूर्वीच नियमावलीमध्ये बदल करण्याबाबतचा प्रस्ताव पुढे आला. या प्रस्तावानुसार सूचना-हरकती मागविण्यात आल्या होत्या. या हरकतींची दखल घेत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने फेब—वारीमध्येच अहवाल तयार करण्यात आला असून तो शासनाला सादर करण्यात आला आहे. परंतु, अद्यापही या नियमावलीबाबत निर्णय घेण्यात आला नसल्याने दोन वर्षापासूनचे पुरस्कार रखडले आहेत. त्यामुळे यावर्षी तरी पुरस्कार वेळेवर मिळतील का याबाबत चर्चा सुरू आहे.
''शिवछत्रपती पुरस्कारा'च्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आले असून, त्याचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. शासनाकडून जे निर्देश येतील, त्याप्रमाणे क्रीडा संचालनालयास्तरावर पुढील कार्यवाही केली जाईल.''
– ओमप्रकाश बकोरिया, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय