Pune : जागा ताब्यात नाही, तरी केले रस्त्याचे भूमिपूजन : पथ विभाग प्रमुख अनभिज्ञच | पुढारी

Pune : जागा ताब्यात नाही, तरी केले रस्त्याचे भूमिपूजन : पथ विभाग प्रमुख अनभिज्ञच

पुणे : पुढारी वृत्तसेवा : धायरी गावात जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून मॅकडोनाल्ड ते सावित्री गार्डनपर्यंतच्या विकास आराखड्या तील 30 मीटर रस्त्यासाठी जागा ताब्यात नसतानाही लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी घाईघाईने भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान, याबाबत आपणास काहीही माहिती नसल्याचे पथ विभागाच्या प्रमुखांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. सिंहगड रस्त्यावरून धायरीकडे जाण्यासाठी सध्या एकच रस्ता आहे. या रस्त्यावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. धायरी व परिसरातील वाढते नागरीकरण आणि भविष्यातील वाढ लक्षात घेऊन महापालिकेच्या विकास आराखड्यात सिंहगड रस्त्यावर धायरी फाट्याचा उड्डाणपूल संपल्यानंतर मॅकडोनाल्ड ते सावित्री गार्डन यादरम्यान 2 किलोमीटरचा 30 मीटर रस्ता दाखविण्यात आला आहे.

या रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया महापालिकेने हाती घेतली आहे. मात्र, त्याला शेतकर्‍यांकडून फारसा प्रतिसाद नाही. रस्त्याची आखणी व्यवस्थित नसल्याने त्यावर शेतकर्‍यांचा आक्षेप आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका अधिकार्‍यांनी जागामालकांच्या बैठकाही घेतल्या. मात्र, त्याला फारसे यश मिळालेले नाही. अशातच, भूसंपादन झालेले नसताना आणि रस्त्याची आखणी निश्चित झालेली नसताना महापालिकेच्या पथ विभागाने रस्त्यासाठी 2 कोटी रुपयांची निविदा काढली आहे. त्यापूर्वी जागा ताब्यात आलेल्या ठिकाणी 80 लाख रुपये खर्च करून शंभर ते दीडशे मीटर डांबरीकरण करण्यात आले आहे.

95 टक्केही जागा ताब्यात नाही

कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी 90 टक्के जागा ताब्यात येणे गरजेचे आहे. मात्र, या प्रकल्पाची 55 टक्के जागा ताब्यात नसताना लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याच्या काही तासआधी भाजपच्या स्थानिक पदाधिकारी यांच्या पुढाकाराने आमदारांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. नियोजित रस्त्याचे यापूर्वी डांबरीकरण झालेले असताना आणि भूसंपादन झालेले नसताना भूमिपूजन कसे? असे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना विचारले असता, या भूमिपूजनाबाबत आपणास काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button