Leopard News : बिबट्याच्या हल्ल्यात तिघेजण जखमी; लांडेवाडी येथील घटना | पुढारी

Leopard News : बिबट्याच्या हल्ल्यात तिघेजण जखमी; लांडेवाडी येथील घटना

मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे गुरुवारी (दि. 21) सायंकाळच्या सुमारास बिबट्याने तिघांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. यामध्ये नितीन रामदास लांडे (वय 35) हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले असून, त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लांडेमळा परिसरात राहणारे नितीन रामचंद्र लांडे हे शेतातील पाणीपुरवठा योजनेचा व्हॉल्व्ह बंद करण्यासाठी निघाले होते. त्या वेळी रस्त्यात बिबट्याची मादी व दोन पिल्ले आली. बिबट्याच्या मादीने नितीन लांडे यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्या उजव्या हाताला बिबट्याचे दात लागले असून, पाठीला पंजाने जखम झाली आहे. त्यांना तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

सोमनाथ किसन आढळराव (वय 40) हे विघ्नेश शशिकांत फदाले (वय 20) याला मोटारसायकलवर घेऊन मंचर-घोडेगाव रस्त्याने लांडेमळ्याकडे निघाले होते. या वेळी बिबट्याने विघ्नेश याच्यावर हल्ला केल्यामुळे सोमनाथ आढळराव घाबरून मोटारसायकलवरून पडले व ते जखमी झाले, तर बिबट्याच्या हल्ल्यात विघ्नेश हा जखमी झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. वन खात्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा व बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच संगीता शेवाळे आणि उपसरपंच अंकुश लांडे यांनी केली आहे. डॉ. श्वेता गोराणे, डॉ. कुलदीप कठाळे, डॉ. अर्जुन दिघे यांनी जखमींवर उपचार केले. दरम्यान मंचर वनपरिक्षेत्राधिकारी स्मिता राजहंस, वनपाल संभाजी गायकवाड, वनरक्षक रईस मोमीन यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची पाहणी केली.

हेही वाचा

Back to top button