Pune News : महापालिकेसमोर बाप-लेकाचे उपोषण; प्रशासन झाले निष्ठुर | पुढारी

Pune News : महापालिकेसमोर बाप-लेकाचे उपोषण; प्रशासन झाले निष्ठुर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोविड काळात महापालिकेला स्वच्छता साहित्य पुरविणार्‍या बाप- लेकाला बिलाचे हक्काचे पैसे मिळविण्यासाठी उपोषण करण्याची वेळ आली आहे. तब्बल गेल्या 31 दिवसांपासून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात हे बाप-लेक उपोषणाला बसले असताना प्रशासनाने त्यांची दखल घेण्याची तसदीही दाखविलेली नाही. कोविड कालावधीत कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाने रेणुकामाता सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. या कंपनीकडून वेगवेगळ्या प्रकाराचे साहित्य घेतले. त्या वेळेस आपत्कालीन परिस्थिती असल्याने या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नव्हती.

संबंधित कंपनीने पुरविलेल्या साहित्यांची बिले वेळोवेळी क्षेत्रीय कार्यालयाला दिली. मात्र, क्षेत्रीय कार्यालयाकडून आतापर्यंत एकही रुपयाची रक्कम या कंपनीला देण्यात आली नाही. या बिलाची एकूण रक्कम दीड कोटी आणि त्यावरील जीएसटीची रक्कम 45 लाख अशी जवळपास दोन कोटी इतकी बिलाची रक्कम आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने अव्वाच्या सव्वा बिले लावल्याचा कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचा दावा आहे. तर ज्या वस्तूची किंमत अडीच हजार रुपये इतकी आहे तिचे बिल महापालिका पन्नास रुपये लावत आहे, असा ठेकेदाराचा दावा आहे. या सगळ्या वादात बिलाची रक्कम अडकून पडली आहे.

त्यामुळे या कंपनीचे चालक असलेल्या बाप-लेकाने गेल्या महिनाभरापासून पालिकेच्या मुख्य दारात उपोषणाला सुरवात केली आहे. मात्र, त्याची दखल वरिष्ठ अधिकार्‍यांनी घेतलेली नाही. याबाबत समिती नेमून नक्की कोणाची बाजू बरोबर आहे, हे प्रशासनाला समजू शकते. मात्र, प्रशासनाने याबाबत उदासीन भूमिका दाखविल्याने भरउन्हाळात पालिका प्रवेशद्वारावर या बाप-लेक ठेकेदाराला 31 दिवसांपासून उपोषण करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा

Back to top button