सन 2000 ते 2001 सालात या परिसरात नागरी वस्ती कमी होती. त्यामुळे महापालिकेने या परिसरातील सुमारे 10 एकर जागा कचर्यापासून खतनिर्मितीसाठी झूम कंपनीला दिली. काही महिन्यांतच झूम कंपनीने गाशा गुंडाळला. अलीकडच्या काळात प्रकल्पाच्या भोवती नागरी वस्ती वाढली. कचरा विल्हेवाट लावणारी यंत्रणा तोकडी आहे. कचर्याचे डोंगर तयार झाले आहेत. दुर्गंधी, माश्या, डासांचा प्रादुर्भाव यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लाईन बझार परिसराला लागूनच गायकवाड मळा, चौगुले मळा आणि देवार्डे मळा आहे. लाईन बझारमध्ये भरगच्च वस्ती आहे. सर्किट हाऊसमागे आणि भोसलेवाडीपर्यंत अपार्टमेंट, बंगले आहेत. या परिसरात या प्रकल्पाचा वाईट परिणाम जाणवत असतो. पेटलेल्या कचर्याची काजळी या परिसरातील घर, रस्ते, टेरेसवर पसरते. त्यामुळे प्रकल्प शहराबाहेर हलविण्याची गरज आहे.