Pune : यंदा धूलिवंदनाला पर्यावरणाचा रंग | पुढारी

Pune : यंदा धूलिवंदनाला पर्यावरणाचा रंग

पुणे : पुढारी वृत्तसेवा : धूलिवंदनाला दरवर्षी त्वचेसाठी हानिकारक ठरणार्‍या ऑइलमिश्रित आणि रासायनिक रंगांची विक्री व्हायची. पण, आता चित्र बदलले असून, वैविध्यपूर्ण पर्यावरणपूरक रंगांची पुणेकरांकडून खरेदी होत आहे. रंग, पिचकार्‍या, फुगे आणि गुलालाच्या खरेदीसाठी रविवार पेठेतील बोहरीआळीसह मंडई आणि ठिकठिकाणच्या दुकानांमध्ये लगबग दिसून येत आहे. यंदा फुले आणि विविध गोष्टींचा वापर करून तयार करण्यात आलेल्या रंगांची खरेदी होत असून, लाल, हिरवा, पिवळा, नारंगी अशा पर्यावरणपूरक रंगांची खरेदी पुणेकरांकडून केली जात आहे.

धूलिवंदन सोमवारी (दि. 25) असल्याने पिचकार्‍यांसह रंगांच्याही खरेदीलाही सुरुवात झाली आहे. यंदा गुजरात, राजस्थानसह महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या रंगांची विक्री दुकानांमध्ये केली जात आहे. विशेष म्हणजे ऑइलमिश्रित आणि रासायनिक रंगांची मागणी पुणेकरांकडून होत नसून, पर्यावरणपूरक रंगांची मागणी होत आहे. रंगांसह फुगे, पिचकार्‍या, टिमकी खरेदीलाही प्रतिसाद आहे.
व्यावसायिक चंदू रांधे म्हणाले, रासायनिक प्रकारातील रंगांची विक्री बंद केली आहे.

पर्यावरणपूरक रंगांच्या विक्रीला विरोध करत आहोत. लोकांकडूनच आता पर्यावरणपूरक रंगांची मागणी केली जात आहे. लाल, हिरवा, गुलाबी, पिवळा असे रंग विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 50 रुपयांच्या पुढे रंगांची किंमत आहे. संगीता काळभोर म्हणाल्या, अनेक वर्षांपासून आम्ही रंग विक्रीचा व्यवसाय करत आहोत. त्वचेला हानी होणार नाही, अशा रंगांचीच विक्री करतो. पर्यावरणपूरक साहित्यांच्या वापरातून रंग तयार करण्यात आले आहेत. यंदा याच रंगांकडे लोकांचा कल असून, याच रंगांना चांगली मागणी आहे.

हेही वाचा

Back to top button