Lok Sabha Election 2024 : येत्या पाच वर्षांत जगाची धुरा भारताकडे : नरेंद्र मोदी | पुढारी

Lok Sabha Election 2024 : येत्या पाच वर्षांत जगाची धुरा भारताकडे : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : येत्या पाच वर्षांत जगाची धुरा भारताकडे असणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
एका खासगी वृत्तवाहिनीच्या सोहळ्यात मोदी बोलत होते. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचली. विरोधी पक्षांना काय वाटते, यापेक्षा जनतेला काय वाटते, हे महत्त्वाचे आहे.

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने केलेल्या आर्थिक उपाययोजनांमुळेच जगभरात भारताचा डंका पिटला जात आहे. झेपावणार्‍या अर्थव्यवस्थेमुळे लवकरच भारत जगातील तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहे. किंबहुना, पाच वर्षांत जगाची धुराच भारताकडे येणार आहे. आगामी पाच वर्षांत भारताचा अभूतपूर्व विकास होणार असल्याची हमी मी आपणास देतो. मोदीची गॅरंटी म्हटल्यावर विकास 100 टक्के होणार आहे. दहा वर्षांपूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात केवळ बजबजपुरी होती.

घोटाळा आणि भ्रष्टाचाराने बरबटलेल्या ‘संपुआ’ सरकारमुळे विकासाला खीळ बसली होती. ‘रालोआ’ सरकारच्या काळात पारदर्शीपणा आला. भ्रष्टाचाराला चाप बसला आहे. ‘संपुआ’च्या काळातील घोटाळेबाजांवर तपास यंत्रणांच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे तपास यंत्रणाच्या माध्यमातून मोदी सरकार विरोधकांना टार्गेट करीत असल्याचा कांगावा विरोधक करीत आहेत. पाच वर्षांत देशात परिवर्तन झाले आहे. कोरोनानंतरच्या संकटानंतरही भारताने झपाट्याने प्रगती केली. त्यामुळे विकसित देशांसह जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या जागतिक वित्तीय संस्थाही अवाक् झाल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

Back to top button