RCB : 16 वर्षांनंतरही आरसीबीच्या पदरी प्रतीक्षाच!

RCB : 16 वर्षांनंतरही आरसीबीच्या पदरी प्रतीक्षाच!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : 2008 मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाला लिगच्या 16 वर्षांच्या इतिहासात एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. या संघाने 2009, 2011 आणि 2016 मध्ये अंतिम फेरी गाठली खरी, पण जेतेपदाचा दुष्काळ तो दुष्काळच राहिला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. असे असले तरी आरसीबीच्या निष्ठावंत चाहत्यांनी आशा सोडलेली नाही. महिला आयपीएलनंतर आता पुरुष गटातही संघ जेतेपद खेचून आणेल, असा त्यांना विश्वास आहे. (RCB)

गेल्या दोन वर्षांपासून दक्षिण आफि-केचा फाफ डुप्लेसिस या आरसीबीचे कर्णधारपद भूषवत आहे. पण या संघाची ओळख केवळ विराट कोहलीमुळेच आहे. कोहलीने दीर्घकाळ आरसीबीचे कर्णधारपद भूषवले, पण तो संघाला चॅम्पियन बनवू शकला नाही. हा संघ दरवर्षीच्या हंगामात खूप मजबूत दिसतो. मात्र, जसजसा हंगाम पुढे सरकत जातो तसतसा तो कमकुवत होतो. यावेळीही असेच काही घडणार की चित्र बदलणार? याची उत्सुकता क्रिकेटच्या चाहत्यांना लागली आहे. (RCB)

आरसीबी म्हणजे फलंदाजीचे पॉवर हाऊस

आरसीबी म्हणजे एक फलंदाजीचे पॉवर हाऊस आहे. कारण या संघात कर्णधार डू प्लेसिस, कोहली, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक या सारखे मैदान गाजवणारे बॅटर आहेत. या सर्वांमध्ये कधीही एकहाती सामना फिरवण्याचे कौशल्य आहे. पण अनेक मॅच विनर्स असूनही महत्त्वाच्या प्रसंगी संघ अपयशी ठरत आहे. गेल्या वर्षी आरसीबीला प्लेऑफमध्येही प्रवेश करता आला नाही.

खेळाडूंची उपलब्धता

संपूर्ण हंगामासाठी बेंगळुरूचे सर्व खेळाडू उपलब्ध आहेत. विराट कोहली इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात कसोटी मालिका खेळू शकला नाही, पण तो चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी बंगळुरू येथील प्री-सीझन कॅम्पमध्ये सामील झाला आहे.

ग्रीनमुळे फलंदाजी मजबूत

ग्रीनच्या ट्रेडने आरसीबीला अव्वल सहामध्ये अतिरिक्त फलंदाजी तसेच गोलंदाजीचा पर्याय मिळाला आहे. फ-ँचायझीने सौरव चौहान, स्वप्नील सिंह आणि टॉम करन यांचा संघात समावेश करून फलंदाजीचे पर्याय वाढवले आहेत. संघात अल्झारी जोसेफ आणि लॉकी फर्ग्युसनसारखे गोलंदाज आहेत. (RCB)

पाटीदारचे पुनरागमन

टाचेच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या गेल्या हंगामात खेळू न शकलेला रजत पाटीदार पुनरागमन करणार आहे. तो आयपीएल 2022 मध्ये प्लेऑफमध्ये शतक झळकावणारा पहिला अनकॅप्ड भारतीय खेळाडू ठरला होता.

जोसेफ धोकादायक ठरेल?

अल्झारी जोसेफ, यश दयाल आणि लॉकी फर्ग्युसन यांना 19 कोटी रुपयांना खरेदी करून संघाने गोलंदाजी मजबूत केली आहे. जोसेफ आयपीएलच्या बहुतांश खेळपट्ट्यांवर चेंडूला अतिरिक्त वेगवान आणि उसळी देऊन धोकादायक ठरू शकतो.

आकाशदीपकडून अपेक्षा

इंग्लंड लायन्सविरुद्धच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर आकाशदीपला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळाले. यासह बेंगळुरूकडे रणजी ट्रॉफीच्या 2023-24 हंगामात 39 बळी घेऊन स्पर्धेत दुसरा सर्वाधिक बळी घेणारा विजयकुमार वैशाख देखील आहे. वानिंदू हसरंगाला रिलीज केल्यानंतर आरसीबीकडे कोणताही अनुभवी लेगस्पिनर उरला नाही. अशा परिस्थितीत त्यांना अनुभव नसलेल्या हिमांशू शर्मा आणि कर्ण शर्मा यांच्यावर अवलंबून राहावे लागेल. हर्षल पटेलच्या अनुपस्थितीत त्यांना डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजीचे पर्यायही शोधावे लागतील. (RCB)

वेळापत्रक कसे आहे?

आरसीबीचा पहिला सामना सीएसके विरुद्ध आहे. हा सामना चेन्नईचे होम ग्राउंड चेपॉक स्टेडियमवर रंगणार आहे. अशातच आरसीबीचे या मैदानावरील रेकॉर्ड खूपच खराब आहे. येथे 2008 पासून कोहलीच्या संघाला धोनीच्या सीएसकेला पराभूत करता आलेले नाही. यानंतर, आरसीबी त्यांचे पुढील तीन सामने बेंगळुरूमध्येच खेळेल आणि त्यानंतर, त्यांना स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील शेवटचा सामना जयपूरमध्ये खेळावा लागेल.

आरसीबीचा संघ : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुयश प्रभुदेसाई, विल जॅक, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक अकमाश, मयंक डागर, विजयकुमार वैश्यक, आकाश दीप, रीस टॉपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news