केडगाव परिसरात ‘जमतारा’ अनुभव; मोबाईलद्वारे अनेकांना गंडा | पुढारी

केडगाव परिसरात 'जमतारा' अनुभव; मोबाईलद्वारे अनेकांना गंडा

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : मोबाईलच्या माध्यमातून दामदुप्पट पैशांच्या लोभापाई केडगाव परिसरात अनेक नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. राकुंटेन या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या नावाने ही फसवणूक करण्यात आली आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, राकुंटेन या आंतरराष्ट्रीय कंपनीबाबत केडगावमधील खासगी शाळेत नोकरीस असलेल्या युवतीला मोबाईलवरून माहिती मिळाली. या कंपनीची माहिती मिळवण्यासाठी या युवतीने 8837309153 या क्रमांकावर संपर्क साधला. पैसे गुंतवणूक करणाऱ्यांना दुप्पट रक्कम दिली जाईल, अशी माहिती या युवतीला देण्यात आली. याबाबत संबंधित कंपनीकडून आमेरा राजपूत नावाने काम करणारी मुलगी फसवणूक झालेल्या युवतीसोबत संवाद साधत होती. 11 नोव्हेंबर 2023 पासून हा प्रकार मोबाईलवरून प्रत्यक्ष संवाद तसेच व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगने सुरू झाला. या वेळी ऐश्वर्या सिंग, अजिना ठाकूर, अनुषा सिंग, नलिनी जॉन, अजंठा ठक्कर आदी महिलांची माहिती देखील या युवतीला दिली गेली.

या सर्वांवर विश्वास ठेवून या तरुणीने काही पैसे ऑनलाइन पाठविले आणि येथूनच फसवणुकीला सुरुवात झाली. प्रथम पैसे पाठविणार्‍या व्यक्तीने साखळी पद्धतीने पैसे गुंतवल्यास मोठा फायदा होईल, अशी माहिती यातील आमेरा रजपूत या मुलीने सांगितल्याने फसवणूक झालेल्या युवतीने आणखी काही ओळखीच्या लोकांना या योजनेबाबत माहिती दिली आणि त्यांनादेखील या कंपनीने गंडा घातला आहे.
सर्वप्रथम या युवतीने तब्बल अडीच लाख रुपयांची गुंतवणूक या कंपनीत केली आहे. त्यांच्याबरोबर शाळेत काम करणार्‍या आणखी एका महिलेला देखील काही हजारांचा गंडा बसला आहे. 11 नोव्हेंबर 2023 ते 13 मार्च 2024 या काळात केडगाव, केडगाव स्टेशन तसेच बोरीपार्धी गावातील अनेक पुरुष आणि महिला याचे बळी ठरले आहेत.

कंपनीचा फोन क्रमांक बंद

राकुंटेन ही कंपनी जापानी आहे, अशी माहिती फसवणूक झालेल्या युवतीला मिळाली होती. त्यांना बंगळूरू येथून अखेरचा फोन आला आणि सध्या तो क्रमांक बंद झालेला आहे. याबाबत तक्रार कुठे आणि कोणाकडे तक्रार करावी, तक्रार केल्यास न्याय मिळेल का? की आम्हालाच याच्यात गुंतून पडावे लागेल, या सर्व जर-तर च्या प्रश्नात फसवणूक झालेल्या कुणीही बदनामीच्या भीतीमुळे याची कुठेही वाच्यता केलेली नाही; मात्र ही सर्व माहिती फसवणूक झालेल्या पहिल्या युवतीने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दै. पुढारीला दिली.

हेही वाचा

Back to top button