पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक सात टप्प्यांत होणार असून, राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित होत आहेत. तर, दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक असलेला मराठा समाज प्रत्येक गावातून लोकसभेला उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची संख्या अधिक असल्यास ईव्हीएमवर निवडणूक घेता येईल का, यावर एका लोकसभा मतदारसंघातून 384 पर्यंत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्यास त्या ठिकाणी ईव्हीएम यंत्र वापरता येईल. मात्र, त्यापेक्षा एकही उमेदवार अधिक असल्यास बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी लागेल, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या केलेल्या सर्वेक्षणातून सामाजिक व शैक्षणिक आर्थिक आधारावर 10 टक्के आरक्षण लागू केले आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यास लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक गावातून उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली. लोकसभा निवडणूक ही ईव्हीएम यंत्रांद्वारे घेतली जात आहे. एका यंत्रावर 16 उमेदवारांची नावे असतात. त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास त्यानुसार यंत्रे जोडावी लागतात. आत्तापर्यंत जास्तीत जास्त 4 यंत्रे जोडण्यात आली. त्यावर 64 उमेदवार आणि नोटा एक अशा 65 उमेदवारांसाठी निवडणूक घेण्यात आली.
एका लोकसभा मतदारसंघातून 384 पर्यंत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्यास त्या ठिकाणी ईव्हीएम यंत्र वापरता येईल. मात्र, त्यापेक्षा एकही उमेदवार अधिक असल्यास बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी लागणार आहे.
ईव्हीएम यंत्रांद्वारे मतदान घेण्यास सुरुवात होण्यापूर्वी मतदानपत्रिका छापल्या जात होत्या. त्यामुळे त्यासाठी उमेदवारांची मर्यादा नव्हती. ईव्हीएम आल्यानंतर उमेदवारांची संख्या कमी राहावी यासाठी अनामत रक्कम आणि अनुमोदकांची संख्या वाढविण्यात आली. त्यामुळे आत्तापर्यंत कोणत्याही मतदारसंघात 64 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिले नसल्याचे सांगण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत 24 बॅलेट युनिट जोडून 384 उमेदवार निवडणुकीत उभे राहिले, तर त्यांची निवडणूक ईव्हीएम यंत्राद्वारेच होईल. त्यापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात आल्यास बॅलेट बुक छापावे लागेल. त्यासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी आहे.
– डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी, पुणे.
हेही वाचा