पुणे : पुढारी वृत्तसेवा : मी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी पुणे, माढा आणि सातारा या लोकसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांकडून केली जात आहे, अशी माहिती खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी (दि. 19) पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. लोकसभेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्याने सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. सर्वच पक्ष उमेदवारांचा शोध घेत आहेत. भाजपने पुणे लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केल्याने ते नेत्यांच्या गाठीभेटी घेत प्रचाराला लागले आहेत. तर, दुसरीकडे मोहोळ यांच्याविरोधात महाविकास आघाडी कोणता उमेदवार देणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
असे असताना शरद पवार यांनी, 'पुणे, माढा व सातार्यातून मी निवडणूक लढवावी,' अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे सांगत सर्वांनाच धक्का दिला आहे. पुण्यातील मोदीबागमधील निवास स्थानी पवार यांनी मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या नेते व पदाधिकार्यांशी चर्चा केली. या वेळी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, मला पुणे, माढा, सातार्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. पण, आतापर्यंत मी 14 निवडणुका लढविल्या आणि जिंकल्या आहेत, असे म्हणत आता निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शरद पवार यांची भेट घेतली.
विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. ज्योती मेटे यांनी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवावी, यासाठी बीडमधील शिवसंग्राम भवनमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये ज्योती मेटे यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी, असे ठरले. या अनुषंगाने ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
भाजपकडे स्वतःचे नेते शिल्लक राहिलेले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते संपविले आहेत. म्हणून त्यांना दुसर्या पक्षातील नेत्यांना घ्यावे लागत आहे, असा टोला शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. प्रा. अंधारे यांनी मंगळवारी (दि. 19) शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
हेही वाचा