कोल्हापूर : 13 साखर कारखान्यांना मिळणार 1898 कोटींचे कर्ज | पुढारी

कोल्हापूर : 13 साखर कारखान्यांना मिळणार 1898 कोटींचे कर्ज

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यास राज्य सरकारने 350 कोटींच्या कर्ज हमी दिली आहे. राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना 1898 कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकार स्वत:च्या जबाबदारीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून कर्ज घेऊन साखर कारखान्यांना देण्यात येणार असल्याचे समजते.

राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींकडून सरकारकडे खेळत्या भांडवलावरील कर्जाच्या मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. दरम्यान, यावर आचारसंहितेपूर्वी राज्यातील प्रस्ताव पाठवलेल्या कारखान्यांची छाननी करून त्यानुसार सरकारच्या हमीवर कर्जाचे प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास निगमला पाठविण्यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.

यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपला समर्थन करणार्‍या 13 साखर कारखान्यांची समितीने निवड केली. त्यामध्ये भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 7 आणि एक कारखाना काँग्रेसशी संबंधित आमदाराचा आहे. विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात येणार्‍या काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड साखर कारखान्यास (भोर) 80 कोटी रुपयांची कर्जहमी देण्यात आली आहे.

Back to top button