Loksabha election : माननीयांच्या नामफलकांची पुनर्रचना; प्रशासनाचा माेठा निर्णय | पुढारी

Loksabha election : माननीयांच्या नामफलकांची पुनर्रचना; प्रशासनाचा माेठा निर्णय

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी माननीयांनी उभारलेल्या नामफलकांची महापालिका प्रशासनाकडून पुनर्रचना केली जाणार आहे. राजकीय पक्षांचे रंग असणारे नामफलक झाकण्यापेक्षा त्यावर रंग लावून त्याचा उपयोग इतर नामफलकांसाठी केला जाणार आहे. महापालिकेकडून केल्या जाणार्‍या विकासकामांना आणि वास्तूंना प्रशासनाकडून निळ्या किंवा हिरव्या रंगाचे नामफलक लावले जातात. या नामफलकांवर वास्तूच्या नावापेक्षा मोठे नाव संकल्पना म्हणून नगरसेवक स्वतःचे टाकतात. एका प्रभागात एकापेक्षा जास्त नगरसेवक असल्याने एकाच ठिकाणी चार-पाच नामफलक उभे करण्यात आले आहेत.

त्यातच नामफलकांवर राजकीय पक्षांचे रंग आणि चिन्ह छापून स्वतःसह पक्षाचीही फुकटची प्रसिद्धी करून घेतली जाते. दुसरीकडे माननीयांनी आपल्या निवास्थानाकडे जाणारा रस्ता दर्शविणारे 20-20 नावफलक उभारले आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक जाहीर केल्याने आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. याचाच एक भाग म्हणून राजकीय पक्षांचा व चिन्हांचा प्रचार होणारे साहित्य आणि वस्तू काढण्याचे व ते नाहीसे करण्याचे काम केले जात आहे. या मोहिमेंतर्गत माननीयांनी उभारलेल्या नामफलकांची पुनर्रचना केली जाणार आहे. ज्या फलकांवर राजकीय पक्षांच्या झेंड्यांचे रंग आहेत किंवा चिन्हे आहेत, अशा नामफलकांना महापालिकेच्या प्रचलित धोरणानुसार रंग देऊन त्या फलकांचा उपयोग इतर नावांसाठी केला जाणार आहे. यामध्ये निवासस्थानाकडे रस्ता दर्शविणार्‍या फलकांवर त्या परिसरातील वास्तूचा किंवा रस्त्याचा उल्लेख असणार आहे. तसेच, अनावश्यक नामफलक काढून त्याचा उपयोग गरज असलेल्या ठिकाणी केला जाणार आहे, असे पालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

शहरात प्रवेश करणार्‍या रस्त्यांवर स्वागत कमान

शहरात प्रवेश करणार्‍या रस्त्यावर महापालिकेची हद्द कुठून सुरू होते, हे दर्शविणारे नामफलक किंवा कमानी दिसत नाहीत. या गोष्टीचा विचार करून शहरात प्रवेश करणार्‍या सर्व मोठ्या रस्त्यांवर महापालिका हद्द सुरू होणार्‍या ठिकाणी स्वागत कमानी उभ्या करण्यात येणार आहेत. तसेच, शहरातील मोठ्या चौकांमध्ये दिशादर्शक नावासह ते ठिकाण किती किलोमीटर लांब आहे, याचा उल्लेखही असणार आहे.

रस्ते सुरक्षेसाठीही उपाययोजना

शहरातील रस्त्यावर सुरक्षेसंदर्भात कोणत्याही साधनांची योग्यप्रकारे सुविधा दिसत नाही. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी सोमवारी अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सुरक्षेसंदर्भातील साधनांची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. रस्तेदुभाजक, चौक, चौकातील बेटे, गोल सर्कल, रस्त्याचे वळण, गतिरोधक, साइडपट्ट्या, झेब्रा  क्रॉसिंग आदी गोष्टी रात्रीच्या वेळी वाहनचालकांना समजाव्यात अशा पद्धतीने रेडियम व रिफ्लेक्टरचा वापर करण्याच्या सूचना या वेळी करण्यात आल्या.

हेही वाचा

Back to top button