इलेक्टोरल बाँड्सबद्दल मंत्री चंद्रकांत पाटलांच मोठं विधान ! | पुढारी

इलेक्टोरल बाँड्सबद्दल मंत्री चंद्रकांत पाटलांच मोठं विधान !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : इलेक्टोरल बाँडचे सगळे पैसे धनादेशाने आले आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही. विरोधकांनी किती आरोप केले, तरी काही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रातील जनतेला त्यासंबंधीचे वास्तव माहीत असल्याने जनता विरोधकांच्या आरोपाला बळी पडणार नाही, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पाटील यांनी सोमवारी पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मोदी फॅक्टर अद्यापही कायम असून, राज्यातील 48 जागा भाजप जिंकणार आहे.

भाजपसाठी पुणे लोकसभेची निवडणूक अवघड आहे, असा विरोधकांचा समज आहे. उद्धव ठाकरे यांच्या सेनेची लाखभर मते कमी झाली, तरी राष्ट्रवादीची दीड लाख मते पुणे शहरात भाजप उमेदवाराला मिळणार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाच्या उमेदवाराने विचार करूनच निवडणुकीला उभे राहावे. माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी अपक्ष निवडणूक लढल्यास भाजपला किती फटका बसेल? या प्रश्नावर पाटील यांनी भाजपला कमी फटका बसेल. मात्र, जास्त फटका मोहन जोशी यांना बसेल, असे सांगत जोशी हेच काँग्रेसचे उमेदवार असतील, असे अप्रत्यक्षपणे
जाहीर केले.

पाटील म्हणाले…

  • पवार कुटुंबातील व्यक्तींना एकमेकांबद्दल काय वाटते? याविषयी बोलणार नाही.
  • रोहित पवार हुशार असतील, तर त्यांनी कोल्हापूरमधील पोलिसांचा अहवाल पाहावा कोल्हापूरची जागा आमच्या बाजूनेच; अमित शहा यांच्या सांगण्यावरून पुण्यात निवडणूक

झोप उडेल असा सोलापूरसाठी उमेदवार

भाजपकडून सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारीची चाचपणी सुरू आहे. आतापर्यंत तीन उमेदवारांबाबत भाजपकडून विचार करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या मतदारसंघातील उमेदवाराबाबत लक्ष घातले आहे. ते अनेकांची झोप उडेल असा योग्य उमेदवार देतील. फडणवीस यांना राजकारणामध्ये जितके लांब दिसते, तितके कोणालाच दिसत नाही. ते कधीच चुकीचा पत्ता काढत नाहीत, असेही पाटील म्हणाले.

हेही वाचा

Back to top button