पुणे: मळवली-कामशेत दरम्यान रेल्वेची ओव्हर हेड वायर तुटली | पुढारी

पुणे: मळवली-कामशेत दरम्यान रेल्वेची ओव्हर हेड वायर तुटली

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोणावळा रेल्वे स्थानकाच्या अलीकडील मळवली ते कामशेत स्थानकादरम्यान रेल्वेची ओव्हर हेड वायर तुटली. त्यामुळे पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक आज (दि.१८) सायंकाळच्या सुमारास विस्कळीत झाली होती. परिणामी, पुणे-मुंबई दरम्यान धावणार्‍या 3 लोकल गाड्या आणि 6 मेल एक्सप्रेस गाड्यांना यामुळे उशीर झाला.
कामशेत रेल्वे स्थानक ते मळवली रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या रेल्वे मार्गावर इंजिनाला विद्युत पुरवठा करणारी वायर (ओएचई) लटकत असल्याचे लोको पायलटच्या निदर्शनास आले. त्याने सायंकाळी 4 वाजून 21 मिनिटांनी रेल्वे पुणे विभागाच्या कंट्रोल रूमला याची माहिती दिली. ही माहिती मिळताच रेल्वे अधिकार्‍यांनी लोणावळा तळेगावदरम्यान लगेचच तांत्रिक ब्लॉक घेऊन रेल्वे गाड्या थांबविल्या. आणि ओव्हर हेड वायर दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले. तब्बल 2 तासांनंतर येथील काम पूर्ण झाले. परंतु, तोपर्यंत 6 मेल एक्सप्रेस आणि 3 लोकल गाड्यांवर परिणाम झाला होता.

रेल्वे अधिकार्‍यांकडून दिलगिरी…

याबाबत रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलींद हिरवे म्हणाले, कामशेत मळवली दरम्यान ओएचई तुटल्याचे निदर्शनास आले. यानंतर तत्काळ ब्लॉक घेऊन या मार्गावरील गाड्यांची वाहतूक थांबविण्यात आली असून दुरूस्तीचे काम सुरू आहे. तसेच, ही वायर कशामुळे तुटली, यासंदर्भात तपास सुरू असून प्रवाशांना झालेल्या तसदीबद्दल रेल्वे पुणे विभाग दिलगिरी व्यक्त करत आहे.
हेही वाचा 

Back to top button