

वडगाव मावळ; पुढारी वृत्तसेवा : मावळ लोकसभा मतदार संघासाठी खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिल्यास मतदानच करणार नाही अशी भूमिका मावळ तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी आज माजी मंत्री संजय बाळा भेगडे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतली असून मावळातून आमदार सुनील शेळके यांच्या पाठोपाठ माजी मंत्री भेगडे यांच्याकडूनही खासदार बारणे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध होत असल्याचे दिसते.
आज सकाळपासून सोशल मीडियावर मावळ तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी मंत्री भेगडे यांच्या निवासस्थानी जमण्याचे मेसेज व्हायरल केले, त्यानुसार भेगडे यांच्या निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली. याठिकाणी माजी मंत्री भेगडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी खासदार बारणे यांच्याविशी तीव्र भावना व्यक्त करत बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला व भेगडे यांनाच उमेदवारी मिळावी अशी स्पष्ट भूमिका मांडली.
यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, प्रभारी भास्करराव म्हालास्का तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गुंड, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, धोंडीबा मराठे, शांताराम कदम, गणेश गायकवाड, नितीन मराठे, बाळासाहेब घोटकुले, लहू शेलार, सुधाकर ढोरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून आमदार शेळके यांनी थेट आधी कामाचा अहवाल मांडा व मग उमेदवारी मागा असे आव्हान देत खासदार बारणे यांना विरोध केला होता, त्यानंतरही खासदार बारणे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले थेट संबंध व महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयानुसार त्यांचेच नाव पुन्हा चर्चेत आले. परंतु आमदार शेळकेंनंतर भाजपच्या गोटातूनही बारणे यांना विरोध होऊ लागला.
आम्ही दोनवेळा बारणेंसाठी झटलो, पण आता आम्हाला बारणे उमेदवार नकोत, यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंना उमेदवारी द्या. अशी आग्रही मागणी करत पुन्हा बारणेंना उमेदवारी दिल्यास आम्ही मतदानच करणार नाही अशी भूमिकाही पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्यामुळे सलग दोन वेळा बारणेंना खासदार करण्यासाठी एकवटलेली भाजपा आज मात्र बारणेंना पुन्हा उमेदवारी नको म्हणून एकवटली असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मावळ तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांची झालेली ही बैठक बारणे यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे.