सहकारचे दहा उपनिबंधक झाले सह निबंधक; सहकारात समाधानाची भावना | पुढारी

सहकारचे दहा उपनिबंधक झाले सह निबंधक; सहकारात समाधानाची भावना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सहकार विभागात कार्यरत असलेल्या गट अ या संवर्गातून 10 उपनिबंधकांना निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात सहनिबंधक सहकारी संस्था या पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. सहकार आयुक्तालयाने शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाले असून सहकारचे दहा उपनिबंधक आता सहकार सहनिबंधक झाल्याचे आदेश 16 मार्च रोजी जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुणे शहर (एक) उपनिबंधक स्नेहा जोशी यांची नाशिक येथील विभागीय सहनिबंधक गावडे हे 30 जून 2024 रोजी सेवानिवृत्त होत असून  त्यानंतर कोल्हापुर विभागीय सहनिबंधकांच्या रिक्त पदावर जोशी यांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे.

धाराशिवचे जिल्हा उपनिबंधक सुनिल शिरापूरकर यांची लातूर येथील रिक्त असलेल्या विभागीय सह निबंधक पदी, मुंबई पूर्व विभागाचे उपनिबंधक संभाजी निकम यांची कळंबोली (ता.पनवेल) येथील मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलादर बाजार समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदोन्न्तीने पदस्थापना करण्यात आली आहे. पुण्यातील पणन उपसंचालक अविनाश देशमुख यांची पुण्यातील साखर आयुक्तालयातील रिक्त असलेल्या सह संचालक (साखर उपपदार्थ) या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. नाशिक येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक राजेंद्रकुमार जोशी यांची नागपूर येथील वस्त्रोद्योग आयुक्तालयातील सह आयुक्तपदी (प्रशासन) पदोन्नती झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील सहकारी संस्थांचे उपनिबंधक प्र.र. फडणीस यांची अमरावती येथील रिक्त असलेल्या प्रादेशिक साखर सह संचालकपदी पदस्थापना करण्यात आली आहे. मुंबई म्हाडा येथील सहकार उपनिबंधक अभिजित पाटील यांची मुंबई येथील झोपडपट्टी पुनर्वसन (पुर्व व पश्चिम उपनगरे) येथील सहनिबंधक या रिक्त पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव प्रकाश अष्टेकर यांची सोलापूर येथील रिक्त असलेल्या प्रादेशिक साखर सह संचालक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

पुणे येथील दुग्ध उपनिबंधक म.य. कदम यांची छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय सहनिबंधक श्री. दाबशेडे हे 30 एप्रिल 2024 रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर पुणे येथील पणन सह संचालक या रिक्त पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपनिबंधक तथा उपसचिव जयंतकुमार पाटील यांची मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सहनिबंधक तथा सहसचिव या रिक्त पदावर पदेान्न्तीने पदस्थापना करण्यात आली आहे. सहकार आयुक्तालयाकडून पाठविण्यात आलेल्या आणि बरेच दिवस रखडलेल्या पदोन्नत्यांवर शिक्कामोर्तब झाल्यामुळे सहकार विभागात समाधानाचे वातावरण आहे. आता अन्य पदावरील अधिकार्‍यांच्या बढत्यांनाही गती मिळण्याची अपेक्षा असल्याची माहिती सहकार आयुक्तालयातून देण्यात आली.

 हेही वाचा

Back to top button