जंगलातील वणव्यांमुळे बिबट्यांची ‘भागमभाग’; मानव-प्राणी संघर्ष तीव्र | पुढारी

जंगलातील वणव्यांमुळे बिबट्यांची ‘भागमभाग’; मानव-प्राणी संघर्ष तीव्र

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : पानशेत खोर्‍यासह सिंहगड भागातील जंगलात पुन्हा भीषण वणव्यांची मालिका सुरू आहे. यामुळे बिबट्यांसह वन्यप्राणी नागरी वस्त्यांत धाव घेत आहेत. तसेच, लाखो रुपयांची वनसंपदा जळून खाक झाली आहे. अनेक पक्षी, प्राणीही वणव्यांत मृत्युमुखी पडले आहेत. पानशेतजवळील शिरकोली येथील जंगलात नुकताच वणवा लागला. यात शिरकोली, वरघड, आंबेगाव खुर्द, घिवशी येथील खासगी व सरकारी जंगल जळून भस्मसात झाले. शिरकोली येथे पानशेत धरणाच्या सामाजिक वनीकरण विभागाने लागवड केलेली पाच हजार झाडे या वणव्यात जळाली आहेत. दोन शेतकर्‍यांनी शेतात रचून ठेवलेला जनवारांचा चारा तसेच आंब्याची झाडे वणव्यात भस्मसात झाली.

जंगलाला चोहोबाजूंनी भीषण वणव्यांनी वेढल्याने दुपारी एकच्या सुमारास दोन बिबटे जीव वाचविण्यासाठी शिरकोली गावात शिरले. एक बिबट्या अनिकेत पासलकर यांच्या घरात शिरला. त्या वेळी अनिकेत यांनी जिवाच्या आकांताने आरडाओरडा करीत घराबाहेर धाव घेतली. त्यानंतर बिबट्या धरणाच्या दिशेने निघून गेला, तर दुसरा बिबट्या गावाजवळ ढेबेवस्तीत शिरला होता. दत्ता ढेबे यांच्या घराच्या पाठीमागे तो लपून बसला होता. गावकर्‍यांनी या बिबट्याला पिटाळून लावले. सिंहगड भागातील अतकरवाडी, घेरा सिंहगडपाठोपाठ खानापूर, मणेरवाडी परिसरातील जंगल भीषण वणव्यात खाक झाले. भरदुपारी रणरणत्या उन्हात डोंगरात अक्षरशः वणव्यांचे तांडव सुरू होते. मणेरवाडीजवळील जंगलात नुकताच भीषण वणवा लागला होता.

अधिकारी म्हणतात…

पुणे-पानशेत रस्त्याच्या गटारात पडलेला कचरा पेटविल्याने मणेरवाडी परिसरातील जंगलात वणवा लागल्याचे सिंहगडचे वनपरिमंडल अधिकारी समाधान पाटील यांनी सांगितले. पानशेत वनविभागाच्या वनपरिमंडल अधिकारी वैशाली हाडवळे म्हणाल्या की, वणव्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात येत आहे.

वणव्यात लाखोंची वनसंपदा नष्ट झाली आहे. जंगलात चारा, पाणी नसल्याने वन्यप्राणी गावात शिरत आहेत. त्यामुळे नागरिकांत दहशत पसरली आहे.

– अमोल पडवळ, सरपंच, शिरकोली

हेही वाचा

Back to top button