Sassoon Hospital : ‘स्काय वॉक’ प्रकल्पाला ब्रेक; निविदांचा थंड प्रतिसादासह निधीचा अभाव | पुढारी

Sassoon Hospital : ‘स्काय वॉक’ प्रकल्पाला ब्रेक; निविदांचा थंड प्रतिसादासह निधीचा अभाव

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससूनमधील जुन्या इमारतीपासून नवीन 11 मजली इमारतीला जोडणार्‍या ‘स्काय वॉक’च्या ड्रीम प्रोजेक्टला तूर्तास ब्रेक लागला आहे. निविदांचा न मिळणारा प्रतिसाद, निधीचा अभाव, इतर वैद्यकीय सुविधांची उभारणी, यामुळे सध्यातरी ‘स्काय वॉक’चा प्रस्ताव बाजूला पडल्याचे ससून रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या विस्तीर्ण परिसरात हेरिटेज इमारत, इन्फोसिस फाउंडेशनची इमारत तसेच नवीन 11 मजली सुसज्ज इमारत, नवीन शवागार, आपत्कालीन विभाग अशा पाच-सहा इमारती आहेत. रुग्णांना एका इमारतीतून दुसर्‍या इमारतीमध्ये नेण्यासाठी किंवा डॉक्टरांना, नातेवाइकांना ये-जा करण्यासाठी बराच वेळ जातो.

वैद्यकीय तपासण्यांसाठी फेर्‍या माराव्या लागतात. त्यामुळे ससूनच्या परिसरातील सर्व इमारती ‘स्काय वॉक’ने जोडण्याचा प्रस्ताव तीन वर्षांपूर्वी मान्य झाला. त्यानंतर मागील तीन वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. आधी कॉरिडॉरच्या कामासाठी तीनदा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ललित पाटील प्रकरणामुळे ससून चर्चेत आले. या सर्व घडामोडींमध्ये मागील तीन वर्षांपासून प्रस्तावित कामे मागे पडली. त्यातच ’स्काय वॉक’चे काम अनिश्चित काळासाठी रखडले आहे.

काय आहे स्काय वॉक प्रकल्प?

ससूनमधील ‘स्काय वॉक’च्या प्रकल्पाला राज्य सरकारने 2021 मध्ये मान्यता दिली. त्यापूर्वी ससून रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सर्व इमारतींची पाहणी केली होती. प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा आढावा घेऊन प्रस्ताव तयार करून राज्य सरकारला पाठविण्यात आला. शासनाने मान्यता देऊन 4 कोटी 23 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. काही महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. सुरुवातीला काहीच प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा प्रक्रिया राबविण्यात आली. प्रकल्पाच्या कामाचे दर कमी असल्याने निविदांना बरेचदा प्रतिसाद मिळाला नाही.

‘स्काय वॉक’ प्रकल्पासाठी राज्य शासनाची मान्यता मिळाल्यावर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. सुरुवातीला निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. सध्या ‘स्काय वॉक’चा प्रस्ताव तूर्तास बाजूला ठेवण्यात आला आहे.

डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय

हेही वाचा

Back to top button