आजी-आजोबा, पालकही परीक्षेत मग्न; राज्यात 6 लाख असाक्षरांची परीक्षा | पुढारी

आजी-आजोबा, पालकही परीक्षेत मग्न; राज्यात 6 लाख असाक्षरांची परीक्षा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पालक नेहमी आपल्या मुलांना परीक्षेसाठी किंवा वर्गात बसवण्यासाठी शाळेत येतात, हे चित्र शाळांमध्ये पाहयला मिळते. परंतु, रविवारी अगदी सुटीच्या दिवशी आपल्या आई-वडिलांना, आजी-आजोबांना किंवा अन्य नातेवाइकांना बेंचवर बसवून परीक्षा देण्यासाठी मदत करणारे विद्यार्थी तर चक्क परीक्षेचा पेपर लिहिण्यात दंग झालेले पालक, असे चित्र शहरातील काही शाळांमध्ये पाहायला मिळाले. केंद्र शासनपुरस्कृत उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवारी 17 मार्च रोजी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत पार पडली.

राज्यात सहा लाख 40 हजार इतक्या असाक्षरांची ऑनलाइन नोंदणी केंद्र शासनाकडे झाली. यातील 6 लाख असाक्षरांनी ही परीक्षा दिली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम 2022 ते 2027 या कालावधीत राबविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. देशातील 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करून महत्त्वपूर्ण जीवनकौशल्ये विकसित करायची आहेत. त्याप्रमाणे नोंदणीकृत असाक्षरांनी चाचणी परीक्षा दिली.

विद्यार्थ्यांना हसू आवरत नव्हते

शाळेत मुले बाहेर आणि पालक आतमध्ये असे चित्र होते. या वेळी आपले पालक पेपर लिहीत आहेत, हे पाहून विद्यार्थ्यांना हसू आवरत नव्हते. तर, पालकांनीदेखील पेन हातात घेतल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर वेगळेच भाव पाहयला मिळाले. पालकांनादेखील काही अडचण आली, तर त्यांची मुलेच त्यांना मदत करत होती.

आमच्या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे पालक हेच असाक्षर म्हणून परीक्षा देण्यास आले होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक शाळेत एकत्र येत असतानाचे चित्र फारच आनंददायक होते. शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचेच कोणी आई-वडील, आजी-आजोबा किंवा नातेवाईक होते.

संध्या जाधव, शाळाप्रमुख, हुतात्मा बालवीर शिरीषकुमार विद्यालय, शिवाजीनगर

हेही वाचा

Back to top button