मी एकाला ‘मोक्का’तूनही वाचविले : अजित पवार यांची कबुली | पुढारी

मी एकाला ‘मोक्का’तूनही वाचविले : अजित पवार यांची कबुली

बारामती : बारामतीतील भाजी मंडईत एक जण फार दादागिरी करीत होता. त्याच्यावर मोक्का कारवाई होणार होती. पण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी मला मदत करायला सांगितले. मी पण त्याला एकवेळ सुधारण्याची संधी म्हणून मदत केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निरावागज येथील सभेत गुरुवारी सांगितले. बारामतीतील जुन्या मंडईच्या ठिकाणी एक मोठे कॉम्प्लेक्स उभारले जात आहे, त्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार हे निरावागजमधील सभेमध्ये देत असताना त्यांनी बारामती शहरातील जुन्या भाजी मंडईतील आठवणीतले किस्से सांगितले. या किश्शातच त्यांनी हे वक्तव्य केले.

नानाला (विश्वास देवकाते) विचारा, नानाचा एक जवळचा माणूस मोक्कामध्ये गुंतत होता, पण त्याला आपण वाचवले. पवार म्हणाले, भाजी मंडईत अचानक कोणीतरी यायचं आणि त्या भाजी विक्रेत्याच्या समोरची भाजी स्वतःच्या पिशवीत टाकून घेऊन जायचं. काही दादा लोकं यायची आणि त्यांना मुकाटपणे द्यावं लागायचं, हे फुकटच कशाला विचारलं तर शेजारच्या विक्रेत्याने सांगितलं की, ती मोठी माणसं आहेत, मग मी म्हणालो, अरे कसली मोठी माणसं? कष्ट आपले, घाम आपला, पीक आपलं, आणि ह्यांनी फुकट घेऊन जायचं हा कसला न्याय? त्यावेळी वेगवेगळ्या सहकार्‍यांनी सांगितले की, दादा एवढ्या वेळ वाचवा. त्याचवेळी सांगितले की, एवढीच वेळ, पुन्हा अजित पवारांकडे यायचं नाही.

हेही वाचा

Back to top button