Cyber Crime : शेअर मार्केटच्या नादात पावणेतीन कोटींवर पाणी | पुढारी

Cyber Crime : शेअर मार्केटच्या नादात पावणेतीन कोटींवर पाणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : तीस ते चाळीस वर्षे काम करून जपून ठेवलेल्या रकमेवर सायबर चोरट्याने डल्ला मारल्याचा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. सेनापती बापट रस्ता परिसरात राहणार्‍या एका वृद्ध महिलेने शेअर मार्केट ट्रेंडिंगच्या नादात अवघ्या दीड महिन्यात तब्बल 2 कोटी 84 लाख 59 हजार रुपये गमावले. याप्रकरणी एका 70 वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. 15) सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील विविध नंबर, विविध बँकधारकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 15 जानेवारी ते 29 फेब्रुवारी 2024 यादरम्यानच्या काळात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ह्या आर्किटेक्ट असून, त्या खासगी कंपनीतून निवृत्त झाल्या आहेत. सायबर चोरट्याने फिर्यादी महिला यांना फेसबुकवरून संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये गुंतवून केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. महिलेने पैसे गुंतविण्यास होकार दिल्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करायला सांगितले. महिलेने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन केल्यावर ट्रेडिंग करण्यासाठी एक अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगितले. यात फिर्यादी यांनी अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.

यानंतर त्यांच्या अ‍ॅपवर शेअर ट्रेडिंगमधून फायदा झाल्याचे दिसून येत होते. मात्र, फिर्यादी यांना ते पैसे काढता येत नव्हते. या वेळी त्यांनी सायबर चोरट्याशी संपर्क केला तेव्हा वेळोवेळी सेबीची आणि मिळालेला नफा आणि पैसे मिळणार नाही, अशी भीती दाखवून आणखी पैसे भरायला सांगितले. फिर्यादी महिलेले 16 वेळा सायबर चोरट्यांच्या बँक खात्यात पैसे पाठविले. मात्र, ते काही परतावा देत नव्हते. यामुळे पैसे मिळणार नाही, याची खात्री झाल्यावर तक्रारदार महिलेने सायबर चोरट्याविरोधात फिर्याद दिली.

फेक अ‍ॅपमध्ये रिअल टाइम डेटा दाखवून फसवणूक

सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांना एन्जल वनसारखे दिसणारे एक शेअर ब्रोकर अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगितले होते. हे अ‍ॅप एन्जल ब्रेकरचे सबब्रोकर असल्याचे सांगितले. फिर्यादी यांची फसवणूक करण्यासाठी त्या अ‍ॅपवर रिअल टाइम डेटा दाखविण्यात येत होता. तसेच, या अ‍ॅपवरून ट्रेडिंग केल्यास अधिक कंपन्यांचे आयपीओ निश्चिय मिळतील, असे सांगून सायबर चोरटे फिर्यादी महिलेकडून पैसे घेत होते.

हेही वाचा

Back to top button