आरटीओची धास्ती : अ‍ॅपद्वारे सेवा देणार्‍या टॅक्सी दिसेनाशा | पुढारी

आरटीओची धास्ती : अ‍ॅपद्वारे सेवा देणार्‍या टॅक्सी दिसेनाशा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने अ‍ॅग्रिगेटर परवाना नाकारल्यानंतर पुणे आरटीओकडून ओला, उबेरसह अ‍ॅपद्वारे टॅक्सी सेवा पुरविणार्‍या टॅक्सीचालकांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात झाली. परिणामी, या कारवाईच्या धास्तीने शुक्रवारी (दि. 15) अ‍ॅपद्वारे प्रवासी सेवा पुरविणार्‍या टॅक्सी दिसेनाशा झाल्याचे चित्र दिसले. मोटार वाहन कायद्यातील तरतुदींची पूर्तता ओला, उबेरसह अ‍ॅपद्वारे सेवा पुरविणार्‍या कंपन्यांकडून करण्यात आली नाही.

त्यामुळे आरटीओकडून कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारनंतर शुक्रवारीही आरटीओ अधिकार्‍यांनी शहरात वायुवेग पथकामार्फत कारवाई करीत अनेक टॅक्सी जप्त केल्या, तर काहींना मेमो देत दंडात्मक कारवाई केली. कारवाईची माहिती शहरात वार्‍यासारखी पसरल्यानंतर अनेक चालकांनी घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे शुक्रवारी रस्त्यावर टॅक्सींची संख्या नगण्य होती. परिणामी, विमानतळावरून प्रवास करणार्‍या आणि मोक्याच्या ठिकाणांहून इतरत्र जाणार्‍या प्रवाशांचे हाल झाले.

मला कामानिमित्त बाणेर भागात जायचे होते. मी अ‍ॅपवरून टॅक्सी बुक करायचा प्रयत्न केला. मात्र, बराच वेळ झाला तरी कोणताही टॅक्सीचालक आमची रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करीत नव्हता. त्यामुळे नाइलाजास्तव बसने
जावे लागले.

– एक प्रवासी

40 टॅक्सी जप्त

पुणे आरटीओने आरटीएच्या बैठकीनंतर अ‍ॅपद्वारे सेवा पुरविणार्‍या टॅक्सीचालकांवर कारवाई करण्यासाठी मोहीम हाती घेतली. त्याअंतर्गत गुरुवारी 13 टॅक्सीचालकांवर धडक कारवाई केली, तर शुक्रवारी तब्बल 40 टॅक्सी जप्त केल्या. त्यामुळे ओला, उबेरसह अ‍ॅपद्वारे सेवा पुरविणार्‍या टॅक्सीचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

विमानतळावर गोंधळ

टॅक्सींवर कारवाई करण्यासाठी 50 आरटीओ अधिकारी बाहेर पडले आहेत, अशी अफवा गुरुवारच्या रात्री टॅक्सीचालकांमध्ये पसरली. त्यामुळे विमानतळावर असलेल्या एरोमॉलमध्ये रात्रीच टॅक्सीचालकांनी सेवा थांबविली. परिणामी, येथे चांगलाच गोंधळ उडाला. टॅक्सी सेवा थांबल्यामुळे रात्री विमानाद्वारे बाहेरून पुण्यात येणार्‍या विमानप्रवाशांना बराच वेळ वाहन उपलब्ध झाले नाही.

हेही वाचा

Back to top button