नामी शक्कल! मक्याच्या पिकात अर्धा एकर अफूची शेती; तिघे पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

नामी शक्कल! मक्याच्या पिकात अर्धा एकर अफूची शेती; तिघे पोलिसांच्या ताब्यात

रावणगाव : पुढारी वृत्तसेवा : खडकी-लोणारवाडी (ता. दौंड) पठारावर मक्याच्या पिकात अर्धा एकरावर अफुची शेती केल्याचा प्रकार गुरुवारी (दि. 14) दुपारी उघडकीस आला. याप्रकरणी दौंड पोलिसांनी जमीनमालकासह तिघांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती. पांडुरंग सखाराम आरेकर (रा. खडकी, ता. दौंड), जीवनलाल शर्मा (रा. राजस्थान) आणि खडकी येथील एका व्यक्तीस (नाव व पत्ता समजू शकले नाही) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खडकी येथील शेतकरी पांडुरंग आरेकर यांची खडकी-लोणारवाडी पठारावर गट क्रमांक 1116/2 मध्ये 15 एकर शेती आहे, ती त्यांनी राजस्थानमधील जीवनलाल शर्मा यास खंडाने कसण्यासाठी दिलेली आहे.

याच क्षेत्रातील मक्याच्या पिकात जवळपास अर्धा एकरवर अफुची शेती केल्याचे आढळून आले. याबाबतची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी गुरुवारी दुपारी त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटावेटर मारून अफूचे पीक नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले. पोलिसांनी जमीन मालक पांडुरंग आरेकर यांच्यासह जीवनलाल शर्मा आणि जमीन खंडाने देण्यासाठी आरेकरांशी मध्यस्थी करणार्‍या खडकी येथील एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांकडून अफुच्या पिकाचे मोजमाप व पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव व सहकार्‍यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा

Back to top button