धक्कादायक ! परप्रांतियांकडून मासेमारीसाठी कीटकनाशकांचा वापर

धक्कादायक ! परप्रांतियांकडून मासेमारीसाठी कीटकनाशकांचा वापर

Published on

पळसदेव : उजनी (यशवंत जलाशय) धरणात बाहेरच्या राज्यातील व काही गुंडगिरी करणार्‍या स्थानिक लोकांमधून मासेमारी करण्यासाठी रासायनिक कीटकनाशक व विषारी औषधांचा वापर करून मासेमारी केली जात आहे. या बेकायदेशीर मासेमारीला प्रशासकीय यंत्रणा चाप लावणार की केवळ बघायची भूमिका बजावून बोटचेपे धोरण राबवणार असा प्रश्न आता येथील सर्वसामान्य नागरिक व स्थानिक मच्छीमारांमधून विचारला जात आहे. उजनी धरण राज्यातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे धरण आहे. याच गोड्या पाण्यातील आधारावर शेती व्यवसायाप्रमाणेच मासेमारी व्यवसाय जोमात चालत होता. परंतु मच्छिमारांच्या मासेमारीसाठी स्वतंत्र महामंडळ असतानाही केवळ राजकीय स्वार्थातून उजनी धरणाला बाहेरच्या राज्यातील नागरिकांमधून व नक्षलवाद्यांकडून धोका असल्याचे सांगत हे धरण जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्यात आले.

उजनीतील मासेमारीसंबंधित कोणतीच माहिती जलसंपदा विभागाकडे नसल्याने उजनीतील मासेमारी व्यवसाय रसातळाला गेला आहे. शिवाय धरण सुरक्षाही उघड्यावर पडली आहे. आजघडीला उजनी धरण परिसरात आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक आदी राज्यातून मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मच्छिमार मासेमारीसाठी आलेले आहेत. त्यांना इंदापूर, करमाळा, माढा, दौंड तालुक्यातील काही गुंड प्रवृत्तीच्या नागरिकांचे सहकार्य लाभत असल्यामुळे यांच्याविषयी कोणताही स्थानिक ब्र उच्चारण्यास धजावत नाही. तसेच प्रशासकीय यंत्रणाही यांच्याच दावणीला बांधलेली असल्याने कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.

याचा परिणाम म्हणून उजनी धरणातील इंदापूर, माढा आणि करमाळा तालुक्यातील शहा, कवेटगाव, वांगी, बिटरगाव, सुगाव आदी ठिकाणी रात्रीच्या वेळेत परप्रांतिय बिहारी मच्छिमार विविध प्रकारच्या शेतीसाठी वापरले जाणारी कीटकनाशके माशाच्या खाद्यात मिसळून व फवारणी करून पाण्यात टाकली जात आहे. हे विषारी द्रव्य पाण्यात सर्वत्र मिसळले गेले की येथील सर्व पाणी दूषित तर होतेच, शिवाय मेलेली व भुललेली मासळी, झिंगे हे परप्रांतिय मच्छिमार गोळा करून नजीकच्याच गावात व तालुक्यात विक्रीसाठी आणत आहेत. या बेकायदेशीर मासेमारीला आळा घालण्यासाठी आणि अपप्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी प्रशासनाने वेळेत ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news